Tue, Jul 14, 2020 06:11होमपेज › Sangli › सोलापुरातील तीन मतदार अचानक ‘गैरहजर’

सोलापुरातील तीन मतदार अचानक ‘गैरहजर’

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 20 2018 11:58PMसांगली ः प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी संघ संचालक मंडळ निवडणुकीत ‘सांगली-कोल्हापूर-सोलापूर’ मतदारसंघातून सांगली बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील (काँग्रेस) इच्छुक होते. सूचक, अनुमोदकसाठी ते सोलापूर जिल्ह्यातील तीन मतदारांच्या संपर्कात होते. मात्र त्यांच्या अचानकच्या ‘गैरहजेरी’मुळे संतोष पाटील यांना  ‘ओबीसी’तून अर्ज दाखल करावा लागला. 

बाजार समिती सहकारी संघ संचालक मंडळ निवडणुकीसाठी राज्यातील 34 जिल्ह्यातून 16  तसेच अनुसूचित जाती, जमातीसाठी 1, वि.जा.भ.ज./वि.मा.प्रवर्गसाठी 1, इतर मागासवर्गीय 1, महिला राखीव 2 अशा एकूण 21 जागांसाठी दि. 18 मार्च रोजी मतदान आहे.  दि. 22 फेब्रुवारी ते दि. 8 मार्च हा कालावधी उमेदवारी अर्ज माघारीसाठी आहे.

सांगली, कोल्हापूर, सोलापूर या तीन जिल्ह्यात 15 मतदार आहेत. सांगली जिल्ह्यात 3, कोल्हापूर 3 व सोलापूर जिल्ह्यात 9 मतदार आहेत. ‘सांगली-कोल्हापूर-सोलापूर’ या मतदारसंघातून बाजार समिती संघावर 1 उमेदवार निवडून जाणार आहे. 

सांगली बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक संतोष पाटील, आटपाडी बाजार समितीचे भाऊसाहेब गायकवाड, इस्लामपूर बाजार समितीचे संपतराव पाटील हे तीनही मतदार राज्य संघावर संचालक पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यामुळे उमेदवारी अर्जावर सूचक, अनुमोदकसाठी त्यांना कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील मतदारांवर अवलंबून रहावे लागले. 

संतोष पाटील यांनी सूचक अनुमोदकसाठी दुधनी (जि. सोलापूर) बाजार समितीचे मतदार प्रतिनिधी अशोक ढंगापुरे, सांगोला बाजार समितीचे मतदार प्रतिनिधी गिरीष गंगथडे, पंढरपूर बाजार समितीचे मतदार प्रतिनिधी दिलीप घाडगे यांच्याशी संपर्क साधला होता. पाटील यांच्या अर्जावर सूचक, अनुमोदक होण्यासाठी त्यांनी होकार दिला होता. मंगळवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस होता. मात्र या तीन मतदारांपैकी एकही जण मंगळवारी पुणे येथे पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक, अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करण्यास हजर राहिले नाहीत. भाजपचे भाऊसाहेब गायकवाड (आटपाडी) यांनाही सूचक, अनुमोदक मिळाले नाहीत. त्यामुळे संतोष पाटील व भाऊसाहेब गायकवाड यांना ‘सांगली-कोल्हापूर-सोलापूर’ मतदारसंघातून अर्ज भरता आला नाही.

 संतोष पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून  उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारी अर्जावर जयसिंगपूर बाजार समितीचे मतदार प्रतिनिधी सुभाषसिंग रजपूत व रत्नागिरी बाजार समितीचे मतदार प्रतिनिधी प्रवीण हंबरे यांनी सूचक, अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. 

‘सांगली-कोल्हापूर-सोलापूर’ या मतदारसंघातील एका जागेसाठी संपतराव पाटील (इस्लामूपर) व जयवंतराव जगताप (करमाळा) यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

जयंत पाटील गटाची उमेदवारीत बाजी; कोल्हापूरची साथ

सांगली बाजार समितीचे संतोष पाटील (काँग्रेस), भाऊसाहेब गायकवाड  (आटपाडी- भाजप) यांना सूचक, अनुमोदक अभावी ‘सांगली-कोल्हापूर-सोलापूर’ या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. मात्र इस्लामपूर बाजार समितीचे संपतराव पाटील यांनी उमेदवारी अर्जासाठी सूचक, अनुमोदकची जुळणी करून बाजी मारली. त्यांच्यासाठी कोल्हापूर बाजार समितीचे कृष्णात पाटील व वडगाव पेठ बाजार समितीचे नितीन चव्हाण हे सूचक, अनुमोदक झाले. पाटील हे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील समर्थक आहेत.