होमपेज › Sangli › ...तर आता लायसन्स होणार रद्द

...तर आता लायसन्स होणार रद्द

Published On: May 01 2019 3:14PM | Last Updated: May 01 2019 3:18PM
सांगली : प्रतिनिधी

वाहनचालकांकडून वाहन चालवत असताना अनेकदा वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केले जाते. अशा वाहतूक चालकांवर पोलिसांकडून कारवाई देखील केली जाते. तरी देखील वाहनचालकांकडून सर्रास नियमाचे उल्लंघन होताना दिसते. मात्र, आता अशा चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. वाहन चालकाचे लायसन्सच रद्द करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात प्रथमच वाहतूक नियमनासाठी ई चलन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही वाहतुकीचे नियम मोडल्यास या ई चलन यंत्रणाद्वारे ऑनलाईन चलनाची नोंद ड्रायव्हिंग लायसेन्समधील चीप वर होणार आहे. यामुळे चोरीचे वाहन तसेच वाहतुकीचे नियम तोडणे या प्रकाराना आळा घालण्यासाठी या यंत्रणेचा प्रभावीपणे उपयोग होणार आहे. 

मागीलवर्षी सांगली शहरात प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. आता ई चलन यंत्रणेने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा यांनी दिली आहे.