Sat, Dec 07, 2019 09:57होमपेज › Sangli › गुन्हेगार पलायन प्रकरणी तीनजणांना अटक

गुन्हेगार पलायन प्रकरणी तीनजणांना अटक

Published On: Apr 08 2019 2:02AM | Last Updated: Apr 07 2019 11:22PM
सांगली / कवठेमहांकाळ : प्रतिनिधी

कवठेमहांकाळ येथील शासकीय रुग्णालयात अमर आटपाडकर या गुन्हेगाराने पलायन केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. त्याला पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून कवठेमहांकाळ पोलिसांनी ही कारवाई केली. तिघांनाही तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.  विशाल बसाप्पा कोलार (वय 21) , सिद्धार्थ अनिल वाघमारे (वय 22), प्रज्वल अनिल माने (वय 19, सर्व रा. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

यातील एक संशयित तेजस शामराव माने  (रा. कवठेमहांकाळ) पसार झाला आहे. अमर आटपाडकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, शस्त्र बाळगणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कवठेमहांकाळ येथे कर्नाटकातील व्यापार्‍याची जीप चोरल्याच्या गुन्ह्यात तो फरारी होता. 

गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने त्याला पेठनाका येथे अटक केली होती. शुक्रवारी त्याला कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यादिवशी सायंकाळी कवठेमहांकाळ पोलिस त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी शासकीय रूग्णालयात घेऊन गेले होते. तपासणी झाल्यानंतर बाहेर आल्यावर आटपाडकरने पोलिसांना हिसडा मारत बेडीसह पलायन केले. 

ही सर्व घटना शासकीय रूग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली होती. आटपाडकर हिसडा मारून पळाल्यानंतर तिघेजण एका मोटारसायकलवरून भरधाव वेगात तो पळाल्याच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजमधून स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी गतीने चक्रे फिरवत तिघांनाही ताब्यात घेतले. 

त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आटपाडकर याला पळून जाण्यास मदत केल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस आटपाडकर याचा शोध घेत असून लवकरच त्याला अटक करू असे निरीक्षक कोळी यांनी सांगितले.