Sat, Jun 06, 2020 14:12होमपेज › Sangli › यावर्षीच्या पावसाने रचला इतिहास 

यावर्षीच्या पावसाने रचला इतिहास 

Last Updated: Nov 10 2019 1:38AM
सांगली : संजय खंबाळे 
गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यात  पावसाचा  धुमाकूळ  सुरू आहे. यावर्षी  जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांतील सर्वाधिक पाऊस झाला आहे. ऑक्टोबरअखेर 8 हजार 987 असा एकूण  176 टक्के सरासरी पाऊस  झाल्याची  नोंद  झाली आहे. या पावसाने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढून नवा इतिहास रचला आहे.  

जिल्ह्यात यावर्षी पावसाचे आगमन थोडे उशिराच झाले. जून महिना  कोरडाच गेला. त्यामुळे खरीप हंगाम लांबणीवर पडला. शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. मात्र जुलै महिन्यापासून तुफानी पावसाला सुरुवात झाली. नदी, ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले. शेतकरी आनंदी झाले. मात्र हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता याची जराही कल्पना बळीराजाला नव्हती. 

ऑगस्ट महिना उजाडला आणि पावसाच्या थैमानाला सुरुवात झाली. आजपर्यंत जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा महापूर ऑगस्ट महिन्यात वारणा व कृष्णा नद्यांना आला. या महापुरात न भुतो, न भविष्य असे व्यापार, शेती, शाळा, घरे अशा सर्वच गोष्टींचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. हा महापूर महाविनाशक  ठरला. 

२००५ च्या तुलनेत २७ टक्के जास्त पाऊस 

२००५ मध्ये कृष्णा व वारणा नद्यांना महापूर आला होता. 2005 मध्ये 5494 मिलिमीटर असा 149.7 टक्के सरासरी पाऊस झाला होता. यावर्षी ऑक्टोबरपर्यंत  सरासरी 8987 मिलिमीटर म्हणजे 176 टक्के पाऊस झाल्याची नोेंद झाली आहे. 2005 च्या तुलनेत 27  टक्के जास्त पाऊस पडला आहे. 

कृष्णेची पातळी रेकॉर्डबेक
सांगलीत आयर्विन पुलाजवळ   58 फुटांपर्यंत पाणी पातळी मोजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 2005 मध्ये आलेल्या महापुरावेळी कृष्णेची पाणी पातळी 53.3 फुटांपर्यंत गेली होती. मात्र यावर्षी आलेल्या महापुरात ती पातळी रेकॉर्डब्रेक 57.4  फूट झाली होती.  

2003 ठरले दुष्काळी वर्ष 
जिल्ह्यात 2000 पासूनची पावसाची आकडेवारी पाहिली तर 2003 हे वर्ष सर्वाधिक दुष्काळी ठरले होते. त्यावेळी  सरासरी 48 टक्के पावसाची नोंद झाली होती. 2001 ला 95, 2002 ला 70 तर 2003 मध्ये 48 टक्के पाऊस झाला. 2001 ते 2003 या सलग तीन वर्षांत जिल्ह्यातील पावसाने शंभरी पार केली नव्हती. 

नोव्हेंबर आता  निम्म्यावर आला तरी पाऊस थांबण्याचे नावच घेत नाही अशी स्थिती आहे. आजही जिल्ह्यात ठिकठिकाणी परतीचा मुसळधार पाऊस सुरूच आहे. यामुळे जिल्ह्यातील शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. यावर्षी झालेला पाऊस हा शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिक अशा सार्‍यांसाठी  विनाशकारक ठरला आहे. नेहमी ‘पाऊस पडू दे’ म्हणून आकाशाकडे डोळे करून प्रार्थना करणारे शेतकरी  ‘आता पाऊस थांबू दे’, म्हणून विनवणी करीत आहेत.

भूजल पातळीत वाढ 
गेल्या काही वर्षांत कवठेमहांकाळ, तासगाव, जत, खानापूर, आटपाडी, मिरज पूर्वभाग या तालुक्यांत पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे भूजल पातळीत मोठी घट झाली होती. शेतीला पाणी नव्हते.त्याबरोबरच लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली होती. मात्र यावर्षी झालेल्या पावसाने भूजल पातळीत मोठी वाढ झाली आहे. काही ठिकाणी तर कूपनलिका ओव्हरफ्लो झाल्या आहेत.

गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यातील एकूण पाऊस 
 वर्ष पाऊस (मि.मी )  टक्केवारी   वर्ष पाऊस (मि.मी )  टक्केवारी  
 2000 4966.9   97.21   2010   6601.8   129.3  
2001             4899.8 95  2011                     4441.2 87.0
2002              3587.1 70   2012            4077.6  79.9
2003           2452 48 2013              5233.2 102.5
2004           5494.6 107.6 2014             5963.7 116.8 
2005             7643.9 149.7 2015               3579.6  70.1
2006           7007.4 137.2  2016             6075.4 119
2007              6564 128.5 2017             5496.4 107.6 
2008           4838 94.8  2018               4124  80
2009             6186.4  121.2 2019           8987  176