Thu, Jul 02, 2020 12:22होमपेज › Sangli › मालगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

मालगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

Published On: Oct 26 2018 12:53AM | Last Updated: Oct 25 2018 11:41PMमालगाव : वार्ताहर

मालगाव (ता. मिरज) येथील बिरोबा मंदिर व मरगुबाई मंदिरासह तीन ठिकाणी गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सुमारे  पंचवीस तोळे सोन्याचे  व अर्धा किलो चांदीचे दागिने असा 8 ते 9 लाखांचा ऐवज  चोरट्यांनी लंपास केला. मंदिराचे पुजारी बिरू गावडे व संजय भानुसे यांनी पोलिसांत तक्रार केली. 

मालगावमध्ये मध्यरात्री तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. गावात भरवस्तीमधील बिरोबा मंदिर, मरगुबाई मंदिर, तसेच रमेश जाधव व संभाजी जाधव यांची बंद घरे चोरट्यांनी  फोडली. यात मंदिरातील सोन्याचे पंचवीस तोळ्यांचे दागिने, देवीची आभूषणे व अर्धा किलोचे चांदीचे अलंकार चोरट्यांनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले आहे.मंदिराचे पुजारी गावडे  सकाळी पूजेकरिता बिरोबा मंदिरात आले. त्यावेळी मंदिराचा दरवाजा उघडा होता आणि गाभार्‍यातील साहित्य विस्कटलेले दिसले. मंदिरात चोरी झाल्याचा संशय आल्याने तत्काळ मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक अनिकेत भारती, पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक कालेकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. 

मालगाव ग्रामपंचायत व बिरोबा मंदिरात ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. चोरीच्या घटना टाळण्यासाठी बाजरपेठ मुख्य चौक या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन उपअधीक्षक अनिकेत भारती यांनी केले.

गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

बाजार भावानुसार सुमारे आठ ते नऊ लाख रुपये किंमतीचे देवीचे अलंकार चोरट्यांनी लंपास केले. पाळत ठेवून चोरी करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गावातील मुख्य चौकात सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरपंच अस्लम मुजावर यांनी यावेळी दिली.