Tue, Jul 14, 2020 04:46होमपेज › Sangli › उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली

उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळली

Published On: Mar 16 2019 2:34AM | Last Updated: Mar 16 2019 2:31AM
सांगली : प्रतिनिधी

लोकसभेच्या जागेवरून सांगली काँग्रेसमध्ये शुक्रवारी जोरदार गटबाजी उफाळली. आ. डॉ. विश्‍वजित कदम आणि युवानेते विशाल पाटील यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांतही वादावादी झाली. अखेर काँग्रेस कमिटीला कुलूप घालण्यापर्यंत वादाचे पर्यवसान झाले. 

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत गेले काही दिवस, माजी मंत्री प्रतीक पाटील की, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील अशी चर्चा रंगली. त्यानंतर आ. विश्‍वजित कदम यांचे नाव पुढे आले. कदम यांनी नकार दिल्यावर विशाल पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली; पण त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे प्रदेश पातळीवरच्या नेत्यांतही संभ्रम निर्माण झाला आहे.
बर्‍याच दिवसांपासून कोणाचे नाव अंतिम होत नसल्याने गुरुवारी अचानक सांगलीची जागा खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला सोडली जात असल्याचे वृत्त आले. वक्ते इंद्रजित देशमुख हे उमेदवार असण्याची शक्यता सांगितली गेली.

ही बातमी कळताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी काँग्रेस कमिटीत बैठक घेऊन या प्रकाराचा निषेध केला. अनेक कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी सांगली हा पक्षाचा बालेकिल्ला आहे, तो काँग्रेसकडेच राहिला पाहिजे; पण  तिकीट सोडण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल, तर तो खपवून घेतला जाणार नाही, असे सांगितले.
विशाल पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, किशोर जामदार, प्रा. सिद्धार्थ जाधव यांनी तातडीने तेथे जाऊन कार्यकर्त्यांना समजावले. तसेच जागा पक्षालाच मिळणार आहे, सर्वांनी श्रेष्ठी देतील त्या उमेदवारास पाठिंबा देऊन निवडून आणू या असा मनोदय व्यक्त केला. विशाल यांची विश्‍वजित यांच्यावर टीका विशाल पाटील यांनी विश्‍वजित कदम यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. दादा घराण्याला संपविण्याचा प्रयत्न कदापि खपवून घेणार नाही. दादा घराण्याची ताकद काय आहे हे दाखवून देऊ, असे पाटील म्हणाले. 

कदम यांचे प्रत्युत्तर

आ. कदम यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन  विशाल    पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेस कमिटीला टाळे ठोकून तमाशा करणार्‍या दादा घराण्याने उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण करण्याचे षड्यंत्र केले आहे. मंत्रिपद आणि 35 वर्षे खासदारकी असतानाही  दादा घराण्याने मैदानातून पळ काढला आहे. प्रतीक पाटील सक्षम नाहीत, त्यांचा संपर्क नाही. त्यांना उमेदवारी देऊ नका, त्यांच्या ठिकाणी अन्य प्रबळ उमेदवार उभा करा, असा प्रस्ताव विशाल पाटील यांनीच पक्षश्रेष्ठींपुढे  ठेवला होता, असा गौप्यस्फोट कदम यांनी केला.या दोघांच्या वक्तव्यांमुळे तसेच काँग्रेस कमिटीत झालेल्या वादावादीमुळे जिल्ह्याच्या राजकीय  वर्तुळात खळबळ उडाली आहे. सर्वत्र या प्रकाराची जोरात चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरूनही याबाबतचे मेसेज व्हायरल केले गेले. तसेच टिपणी करणारे संदेश पाठवून एकमेकांची खिल्ली उडविली जात आहे.