होमपेज › Sangli › सांगली : कुपवाडमध्ये एकाच रात्रीत दहा दुकाने फोडली 

सांगली : कुपवाडमध्ये दहा दुकाने फोडली 

Published On: Oct 05 2019 4:52PM | Last Updated: Oct 05 2019 4:52PM

कुपवाडमध्ये एकाच रात्रीत दहा दुकानात चोरी कुपवाड : वार्ताहर 

कुपवाड शहरातील सोसायटी चौकातील मुख्य रस्त्यालगत असलेली दहा विविध दुकाने शुक्रवारी रात्री चोरट्यांनी फोडून 61 हजार रुपयांची चोरी केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. दरम्यान, कुपवाड पोलिसांनी बसविलेली पाच सीसीटीव्ही कॅमे-यापैकी चार कॅमेरे बंद असल्याने व्यापारी व नागरिकामधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी मध्यरात्री शहरातील सोसायटी चौकातील मुख्य रस्त्यालगत असलेली विविध दहा दुकानांची शटरची कुलुपे तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कमेसह सीसीटीव्हीचे डीव्हीआर असा 61 हजार रुपयांची चोरी केल्याने शहरात खळबळ माजली आहे. रेणुका एंटरप्रायझेसमधील रोख चाळीस हजार  व सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर अशी 45 हजार रुपयांची चोरी झाली आहे. 

राजपुरोहीत बेकरीतील रोख तीन हजार रूपये, ए वन शृंगार स्टेशनरीमधील 7 हजार 300 रुपये, अलमदिना स्टेशनरी स्टोअर्स 100 रुपये, शबाना जनरल स्टोअर्स 400 रुपये, गोमटेश दूध संकलन 4 हजार रुपये, अलमदीना स्वीटस बेकरी 1 हजार रुपये, अशी 61 हजार रुपयांची चोरी झालेली आहे. 

सीसीटीव्ही कॅमेरे बंद 

शहरातील सोसायटी चौकात मुख्य रस्त्यावर दोन, देशभक्त आर.पी.पाटील चौकातील भाजी मंडईत तीन असे पाच सीसीटीव्ही कॅमेरे गणेश मंडळ, व्यापारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीतून पोलिस प्रशासनाने बसविलेले आहेत. त्यापैकी चार कॅमेरे बंद असल्याची तक्रार नागरिकांनी अनेकवेळा पोलिसांच्याकडे केली होती. परंतु, सदरची कॅमेरे दुरुस्त करण्यात आली नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेऊन दहा दुकाने फोडण्याचे धाडस केले आहे.

शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेली दहा विविध दुकाने चोरट्यांनी फोडल्याने व्यापारी व नागरिकामध्ये भितीचे वातावरण पसरले असून चोरीच्या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दसरा, दिवाळी मोठे सण असल्याने पोलिस प्रशासनाने बंद पडलेली सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने दुरूस्त किंवा नवीन अत्याधुनिक कॅमेरे बसवावेत अशी मागणी होत आहे.