होमपेज › Sangli › सांगलीतील युवकाला दहा वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा

सांगलीतील युवकाला दहा वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा

Last Updated: Nov 06 2019 1:53AM
सांगली : वार्ताहर
अति मद्यप्राशन करुन भरधाव वेगाने गाडी चालवून तीन मित्रांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल नितांत राजन बुटाले (वय 29, रा. पत्रकारनगर, सांगली) याला दहा वर्षे सक्तमजुरी व 1 लाख 50 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्रन्यायाधीश ए. आर. पेरमपल्ली यांनी सुनावली. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मकरंद ग्रामोपाध्ये यांनी काम पाहिले. 

खटल्याची पाश्‍वभूमी अशी : नितांत बुटाले हा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याच्याकडे सुनिल मडके  सुपरवायझर म्हणून काम करीत होते.  मयत विकी अंकुश चव्हाण (वय 23 रा. यशवंतनगर), सम्मेद भारत निल्ले (वय 20 रा. राधानगरी) व निनाद राजेंद्र आरवाडे (वय 22 रा. एस. टी. कॉलनी, विश्रामबाग) हे बुटाले याचे मित्र होते. 

निनाद आरवाडे हा सिव्हील इंजिनिअर होता. त्यामुळे त्याला अमेरीकेतील एका कंपनीमध्ये नोकरी मिळाली होती. दि.31 जुलै 2017 रोजी तो अमेरिकेला जाणार होता. तसेच विकी चव्हाण याला पुणे येथे एमबीए च्या शिक्षणासाठी प्रवेश मिळाल्याने तो दि. 7 जुलै रोजी पुणे येथे जाणार होता. 

इंजिनिअर असलेले तिघे मित्र वेगवेगळ्या ठिकाणी जाणार असल्याने सर्वांनी पार्टी करण्याचे ठरविले. दि. 6 जुलै 2017 रोजी  नितांत बुटाले हा बांधकामासाठी खडी खरेदी करण्यासाठी टोप संभापूर येथे गेला होता. दुपारी 12 वाजता निनाद आरवाडे याने बुटाले याला फोन करुन संध्याकाळी जेवणासाठी येण्याचे निमंत्रण दिले. वॉन्लेसवाडी येथील एका हॉटेलमध्ये जेवणाचे नियोजन केले. रात्री 10 वाजता बुटाले हॉटेलवर पोहोचला. तत्पूर्वी त्याचे अन्य मित्र तेथे बसले होते. 

जेवण येईपयर्ंत सर्वांनी मिळून दारू प्यायली. जेवणाची ऑर्डर दिली. सर्वांचे रात्री दीड वाजता जेवण संपले. त्यानंतर सिगारेट ओढण्यासाठी सर्वजण राममंदिराकडे स्विफ्ट गाडीतून चालले होते.  बुटाले गाडी वेगाने चालवत होता. त्याच्या शेजारी निनाद आरवाडे बसला होता. मागील सीटवर  सुनील मडके, विकी चव्हाण व सम्मेद निल्‍ले बसले होते. 

नितांत बुटाले याचा  गाडीवरील ताबा सुटला व मार्केट यार्डसमोरील एका झाडावर गाडी आदळली. त्या धडकेचा एवढा मोठा आवाज झाला की आजूबाजूचे लोक जागे झाले व घटनास्थळी आले. त्यापैकी अज्ञाताने विश्रामबाग पोलिसांना अपघाताची खबर दिली. सहाय्यक फौजदार सुनिल कोलप, हवालदार नाईक व लोहार काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले.  सर्वांना मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या अपघातामध्ये विकी चव्हाण व सम्मेद निल्ले यांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचारा दरम्यान  आरवाडे याचा मृत्यू झाला.  बुटाले याच्यावर उपचार करण्यात आले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी तपास करुन आरोपपत्र दाखल केले. 

सरकारपक्षातर्फे  11 साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुुनिल मडके, विजय चव्हाण, मयूर भोकरे, अजिंक्य मोहिते यांची साक्ष ग्राह्य धरुन न्यायालयाने शिक्षा सुनावली. पोलिस कॉन्स्टेबल इम्रान महालकरी, सौ. वंदना मिसाळ, गणेश वाघ व रमा डांगे यांनी सरकार पक्षाला मदत केली. न्यायालयाने भा. दं. वि. कलम 304 (2) अन्वये दोषी ठरवून शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष जादा सक्तमजुरीची शिक्षा भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

जिल्ह्यातील सर्वात मोठी शिक्षा 
एका चित्रपट अभिनेत्याच्या हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणानंतर कायद्यात बदल करण्यात आला. भा. दं. वि. कलम 304(2) मध्ये शिक्षेचा कालावधी वाढवून 10 वर्षे करण्यात आला आहे. आता या  खटल्यामध्ये न्यायालयाने सर्वाधिक म्हणजे दहा वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.अशा प्रकरणात दहा वर्षे शिक्षा झालेला हा जिल्ह्यातील पहिलाच निकाल आहे.  
-अ‍ॅड. उल्हास चिप्रे, जिल्हा सरकारी वकील