होमपेज › Sangli › लाचप्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना कोठडी

लाचप्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षकासह दोघांना कोठडी

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jul 01 2018 12:03AMसांगली ः प्रतिनिधी

तपासात मदत करण्यासाठी पंधरा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांच्यासह त्यांना मदत करणारा नोमान वठारे या दोघांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तपासात सहकार्य करत नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी न्यायालयात केली होती. 

तक्रारदार यांचा मावसभाऊ व त्याच्या मित्रावर आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणाचा तपास तेजश्री पवार यांच्याकडे आहे. पवार यांनी  तक्रारदाराच्या मावसभावास तपासात मदत करण्यासाठी 30 हजार रूपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे  तक्रार केली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी  15 हजारांची लाच घेताना पवार यांना शुक्रवारी दुपारी पकडले होते. पवार यांना यामध्ये मदत करणारा नोमाज वठारे यालाही अटक करण्यात आली होती. दोघांनाही शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

पवार यांच्या घराची झडती

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  तेजश्री पवार यांच्या आष्टा येथील घराची झडती घेतली. यावेळी काही कागदपत्रे तसेच अन्य बाबींची चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.