Mon, Jul 06, 2020 16:58होमपेज › Sangli › पश्‍चिम भागाचीही होरपळ

पश्‍चिम भागाचीही होरपळ

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 13 2018 10:51PMम्हैसाळच्या आशेवर फिरले ‘पाणी’

साळ योजना सुरू झाली तरी पाणी स्रोतांना अद्याप पाझर फुटला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असताना, पुरवठा करणार्‍या स्रोतांमध्ये पाण्याचा ठणठणगोपाळ असताना अजूनही शासनाला हे स्रोत योजनेच्या पाण्यातून भरून घेण्यासाठी पाझर फुटेना, असे विदारक चित्र पूर्व भागात पहावयास मिळत आहे.  
लक्ष्मीवाडी, आरग, शिंदेवाडी, खटाव, बेळंकी, जानराववाडी, संतोषवाडी, सलगरे, चाबूकस्वारवाडी यासह सर्वच गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई अद्याप हटली नाही. म्हैसाळ योजना सुरू झाली की प्यायला पाणी मिळेल, या पूर्व भागातील जनतेच्या आशेवर अद्याप तरी पाणीच फिरले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे.

नळपाणीपुरवठा करणार्‍या गावाबाहेरील विहिरीत अद्याप पाणी फुटले नसल्याने टंचाई अद्याप हटलीच नाही. लक्ष्मीवाडी येथील नळपाणी पुरवठा बंद आहे.
आरग तलावाखाली विहिरीत पाणी नाही. योजनेतून पाणी संथगतीने तलावात सुरू आहे. पण पूर्ण तलाव कधी भरणार त्याखालील विहिरीला पाझर कधी फुटणार आणि पाणीप्रश्न कधी सुटणार, हा प्रश्न आहेच. चाबूकस्वारवाडी येथे दीड महिन्यापासून टंचाई गंभीर आहे. लोकप्रतिनिधी यांनाच पाण्याचे बॅरल घेऊन भटकण्याची वेळ आली आहे. सलगरे येथील पाचव्या टप्प्यात पाणी आले. पण चाबूकस्वारवाडीला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत पाणी नाही. शेजारच्या तलावात पाणी सोडले नाही. त्यामुळे येथे पाणीप्रश्न गंभीर आहे. 

खटाव येथे गावभाग आणि वाडी-वस्तीवर पाण्याची टंचाई तीव्र आहे. खासगी  कूपनलिका आणि काही विहिरींवर गाव लोटत आहे. ना टँकर ना नळपाणी गार्‍हाणी सुरूच अशी स्थिती निर्माण झाली आहे. लिंगनूर येथे कूपनलिका आणि विहिरीतील पाणी पुरवून वापरले जात आहे. दोन दिवस आड पाणी मिळत आहे. 
बेळंकी येथे ग्रामपंचायतीने दिलेल्या छोट्या टाक्यातून पाणी पुरविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. बेळंकी येथील पाणीपुरवठा करणारी विहीर अजून कोरडी आहे. सलगरे येथे ग्रामपंचायत विहिरी आणि नवीन खोदलेली कूपनलिका यांचे पाणी एकत्र करून पुरवून पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जवळपास पूर्व भागातील सर्वच गावात ही स्थिती कमी अधिक फरकाने दिसून येत आहे. 

उन्हाच्या तडाख्याने पिके लागली करपू
कृष्णा नदीचे पाणी उपलब्ध असूनही भारनियमन व वाढत्या उन्हामुळे पलूस तालुक्यातील पिकांची होळपळ होऊ लागली आहे. उसाबरोबर केळी, हळद व इतर बागायती पिकांचे उत्पादन घटून शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. ऊस तोडीसाठीही शेतकर्‍यांची लूट होत आहे. कारखान्यांनी दरही 400 रुपये कमी केला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पलूस तालुक्यात एप्रिल महिन्यातच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने पिके दुपार धरू लागली आहेत. भाजीपाला, फळभाज्या त्याचबरोबर उसाच्या खोडवा पिकांवरही उन्हाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यांची वाढ खुंटू लागली आहे. वाढत्या भारनियमनांचा फटका बसत आहे.  महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा खंडित करण्याचा उद्योग करतात.  त्यामुळे शेतकर्‍यांना शेतीला पाणी देण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेने  शेतजमीन  तापल्याने पाटाने सोडलेले पाणी पुढे  न सरकल्याने पुन्हा पाणी तिथेच जात आहे. त्याचबरोबर तालुक्यातील काही भागात पिण्याच्या पाण्याची किरकोळ टंचाई जाणवत आहे.

 पाणीपातळी खालावली
मिरज पश्चिम भाग हा बहुतांश वारणेच्या काठावर वसलेला आहे. वारणेच्या कृपेमुळे  हा भाग सुजलाम, सुफलाम् आहे.  पण  अलिकडे परिस्थिती बदलू लागली आहे. वारणेची सतत खालावणार्‍या  पातळीमुळे भागातील पिकांना पाणी कमी पडू लागले आहे. पिकांच्या वाढीवर परिणाम होऊ लागला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. 
हा भाग हुकमी ऊस व भाजीपालासाठी प्रसिध्द आहे. हळद, केळी, सोयाबीन, ढबू मिरची अशी बागायती पिकेही या भागात मोठ्या प्रमाणात घेतली जातात. मात्र अतिपाण्याने या परिसरातील जमिनी क्षारपड बनल्या आहेत. या भागातील जाणकर लोक सांगतात की पूर्वीच्या काळी उन्हाळ्यातही या भागातील विहिरी पाण्याने भरलेल्या असायच्या. यामुळे शेतीला मुबलक पाणी मिळत होते. पण आज या ठिकाणच्या विहिरींतील पाण्याची पातळी 60 ते 70 फूट  खालावली आहे. उन्हाच्या तडाख्याने ऊस, भाजीपाला करपू लागला आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून हातामध्ये निदान पोट भरण्या इतपत तरी पडेल की नाही, याची शाश्‍वती नाही. 
 

पिके झाली नामशेष 
या भागात पूर्वीच्या काळी तंबाखू, तूर, हळद, सूर्यफूल या सारखी पिके घेतली जात होती. अनेक जिल्ह्यामध्ये मागणी मोठी होती. पण शेतकर्‍यांच्या मानसिकतेमध्ये बदल होत गेला. कमी कालावधीत जादा उत्पन्न मिळवण्याच्या हव्यासापोटी शेतकरी ऊस, भाजीपाला पिकाकडे वळला. त्यामुळे ही पिके या भागातून नामशेष झालीच तर पाण्याचा अतिवापराने हजारो एकर जमीन आज क्षारपड झाली आहे. त्यामुळे चार ते पाच एकर शेती असून देखील दुसर्‍याच्या शेतामध्ये कामाला जाण्याची वेळ अनेकांवर आली आहे. पाण्याचा अतिवापर, बेसुमार औषधांच्या फवारण्या, तेच ते पीक यामुळे जमिनीची पोत कमी होत  चालला आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादक क्षमता कमी होत आहे.