Fri, Apr 26, 2019 20:02होमपेज › Sangli › सांगली : ऊस दर आंदोलनाला हिंसक वळण

सांगली : ऊस दर आंदोलनाला हिंसक वळण

Published On: Nov 10 2018 1:14AM | Last Updated: Nov 10 2018 1:14AMसांगली : प्रतिनिधी

ऊस दर जाहीर झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाने शुक्रवारी हिंसक वळण घेतले. संघटनेतर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी जाळपोळ, ट्रॅक्टरचे नुकसान करण्यात आले. कामेरीत राजारामबापू कारखान्याचे कार्यालय पेटविण्यात आले. कसबे डिग्रज येथे वसंतदादा कारखान्याचे कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न झाला. तर रेठरेधरण, वड्डी, दुधगाव, सावळवाडीत ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. 

उसाला एफआरपी अधिक दोनशे रूपये दर मिळावा, दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चार दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी संघटनेने जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांवर दुचाकी रॅली काढून कारखान्यांच्या व्यवस्थापनास निवेदन दिले होते. त्यानंतर शुक्रवारी संघटनेच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. मंगळवारी ऊस दरासाठीच जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेकही करण्यात आली होती. 

शुक्रवारी वाळवा तालुक्यातील कामेरी येथे राजारामबापू साखर कारखान्याचे गट कार्यालय अज्ञातांनी पेटवून दिले. तर आष्टा येथे ऊस घेऊन जाणार्‍या टॅ्रक्टरच्या टायर पेटवून देण्यात आल्या. भडकंबे येथेही दोन ट्रॉल्या पेटवून देण्यात आल्या. दरम्यान रेठरेधरणजवळ ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर, ट्रॉलीच्या टायर कार्यकर्त्यांनी फोडल्या. दरम्यान मिरज तालुक्यातही आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. वड्डी येथे टॅ्रक्टर आणि ट्रॉलीच्या टायर पेटवून देण्यात आल्या. तर दुधगाव, सावळवाडी येथे ऊस भरून उभ्या असलेल्या ट्रॅक्टर, ट्रॉलीच्या टायरमधील हवा सोडण्यात आली तर हेडलाईटही फोडण्यात आल्या. दरम्यान पलूस तालुक्यातही ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी सुरू असलेल्या तोडी बंद पाडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात सध्या तरी ऊस तोडी बंद असल्याचे चित्र आहे.