Sat, Jul 11, 2020 13:12होमपेज › Sangli › मराठी शाळांचा अस्तित्वासाठी संघर्ष

मराठी शाळांचा अस्तित्वासाठी संघर्ष

Published On: Jun 28 2018 1:35AM | Last Updated: Jun 27 2018 8:11PMऐतवडे बुद्रूक : सुनील पाटील 

ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांना सध्या अस्तित्वासाठी संघर्ष करायची वेळ आली आहे. एकूणच खासगी शाळांची वाढलेली  संख्या आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा झंजावात यामध्ये या मराठी शाळा काळाच्या ओघात टिकणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

इंग्रजी शाळांचा प्रभाव वाढतो आहे. पालकांची मानसिकता बदलते आहे. गावातील  नेतृत्वाची प्राथमिक शाळांबाबतची आत्मीयता  कमी झाली  आहे. त्यातच  शासनाने शाळाबाह्य कामकाज शिक्षकांवर लादले आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर  प्राथमिक शाळांना अस्तित्वासाठी आणि मुख्य म्हणजे पट टिकविण्यासाठी झगडण्याची वेळ आली आहे.
या शाळा कोणत्याही परिस्थितीत टिकल्याच पाहिजेत. किंबहुना वाढल्या पाहिजेत. अन्यथा उपेक्षित, वंचित व गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणे दुरापास्त होईल, असे मत जाणकार व्यक्‍त करीत आहेत.

प्राथमिक शाळांच्या या  परिस्थितीचे गांभीर्य कोणालाही नाही. याउलट खासगी शिक्षण संस्था राजकीय नेत्यांच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या उन्नतीसाठी त्यांची खटपट सुरू असते. पण प्राथमिक शाळांना वाली कोण? असा प्रश्‍न विचारला जातो आहे.  विद्यार्थी संख्या घटली, वर्ग कमी झाले तर त्याकडे कोण लक्ष देणार?पालकांमध्येही प्राथमिक शाळांविषयी दुजाभाव निर्माण झाला आहे असे जाणवते. इंग्रजी माध्यमांमधील शाळांकडे त्यांचा अधिक ओढा आहे. गुणवत्तेपेक्षाही  झगमगाटाला अधिक महत्त्व आले  आहे. 

काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकविणार्‍या शिक्षकांचे शिक्षण हे मराठी माध्यमातूनच झालेले असते. जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षणही गुणवत्तापूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र,   इतरांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत  जातात तर आपली का नको, या भूमिकेतून पालक मराठी शाळांकडे पाठ फिरवित आहेत. त्यातच प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाबाबत शासनाकडून  विविध  प्रयोग होत आहेत, त्यामुळेही संभ्रमावस्था आहे.

वस्तुस्थिती अशी आहे, की प्राथमिक शाळांमध्येही शिक्षणाची गुणवत्ता  जोपासली जाते. परंतु काळाचा महिमा म्हणून तिकडे दुर्लक्ष होते आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वाळवा तालुक्यातील लाडेगाव येथे ‘सरपंच, उपसरपंच  आपल्या दारी’ अशी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे घराघरात जाऊन मुला-मुलींना मराठी शाळेत पाठवा, अशी विनंती पालकांकडे करण्यात आली. मराठी शाळा टिकविण्यासाठी सरपंच रणधीर पाटील, उपसरपंच अरविंद देसाई  प्रयत्न करीत आहेत. त्याच धर्तीवर अन्य गावातील  स्थानिक नेत्यांनीही मराठी शाळांकडे लक्ष देण्याची गरज आहे.