होमपेज › Sangli › ‘खानापूर’मध्ये नवीन समीकरणांचे संकेत

‘खानापूर’मध्ये नवीन समीकरणांचे संकेत

Published On: Jul 05 2019 1:34AM | Last Updated: Jul 04 2019 9:16PM
विटा : विजय लाळे

काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि बहुजन वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर यांची बहुचर्चित भेट. रविवारी रात्री झालेल्या या  कथित भेटीमुळे खानापूर विधानसभा मतदार संघाचे राजकीय वातावरण अचानक ढवळून निघाले आहे. खानापूर - आटपाडी विधानसभा मतदारसंघात नवीन राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

खानापूर मतदारसंघात आमदार अनिलराव बाबर यांच्या विरोधात इतर सगळे विरोधक मिळून एक उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची  चर्चा जोरात आहे. आमदार बाबर हे शिवसेनेचे असले तरी त्यांचे भाजपबरोबर अत्यंत चांगले संबंध आहेत.  लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील यांना या मतदारसंघात लक्षणीय मताधिक्य देताना मागील पाच वर्षात स्वतःच्या विरोधातील सार्‍या राजकीय शहकाटशहच्या हालचालींना विसरून आमदार बाबर यांनी मनापासून प्रयत्न केले. त्यातूनच भाजपचे खासदार पाटील यांना खानापूर मतदारसंघात वंचित आघाडीकडून गोपीचंद पडळकर हे  स्थानिक उमेदवार असून देखील  हजार दीड हजार मतांची आघाडी मिळाली.

याचदरम्यान, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी आगामी विधानसभेसाठी राजकीय गणिते कशी राहतील, याचा विचार करून काँग्रेस आघाडीकडून निवडणूक लढवणार्‍या स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांना पूर्ण ताकद दिली. त्याचा परिणाम म्हणून विशाल पाटील यांना विटा शहरात द्वितीय क्रमांकाची मते मिळाली.  

येणार्‍या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप या दोन राजकीय पक्षांची युती कायम राहील, असे या दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत आणि नंतरही आजपर्यंत वेळोवेळी जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर संभाव्य युती गृहित धरून आमदार बाबर हेच युतीचे  उमेदवार असतील, हे  निश्चित मानले जात आहे. 

याचवेळी काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्ष आणि बहुजन वंचित आघाडी यांच्यात महाआघाडी करून भाजप सेनेला शह द्यावा, असा विरोधकांमध्येही प्रवाह जोर धरत आहे. किमान एकास एक उमेदवार देऊन भाजप सेनेला जेरीस आणायचे धोरण सध्या विरोधकांकडून आखले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून खानापूर मतदार संघात आमदार बाबर यांच्या विरोधात तगडा उमेदवार द्यायची खेळी विरोधक खेळणार याचीच अधिक शक्यता आहे. 

मात्र आमदार बाबर यांच्या विरोधात नक्की कोण, यावर आज  तरी विरोधकांत एकमत झालेले दिसत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर माजी आमदार पाटील आणि पडळकर यांचीही कथित भेट झाल्याचे वृत्त आहे, मात्र अद्याप तरी  भेट झाल्यानंतर दोन्हीकडून जाहीरपणे काहीही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र यामुळे  अनेक प्रकारच्या राजकीय शक्यतांना वेग आलेला आहे.

खानापूर  मतदारसंघात खानापूरसह आटपाडी हे दोन संपूर्ण तालुके आणि विसापूर मंडलातील 21 गावे यांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यात राजेंद्रअण्णा देशमुख यांचा गट आणि दुसरा पडळकर यांचा गट या दोन मोठ्या राजकीय शक्ती आहेत.  पडळकर हे ज्यावेळी भाजपात होते त्यावेळी देशमुख गट गोपीचंद पडळकरांचा हात पकडून भाजपमध्ये  आला. त्यावेळी गोपीचंद पडळकर यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केली होती. 

याचवेळी पडळकर यांनी लोकसभा  निवडणुकीच्या धामधुमीत खासदार संजय पाटील यांच्यावर टीका करत भाजपशी काडीमोड घेतला आणि सांगली लोकसभेसाठी स्वतःची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर उमेदवारीसाठी अनुक्रमे काँग्रेस आणि स्वाभिमानी या दोन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांबरोबर चर्चा केल्या होत्या.

 मात्र त्या सफल झाल्या नाहीत. अखेरीस त्यांनी वंचित आघाडीकडून उमेदवारी केली. त्यांनी  खानापूर मतदारसंघातून दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवली. दुसरीकडे खानापूर तालुक्यातही  दोन  मोठ्या राजकीय शक्ती आहेत. एक अनिलराव बाबर गट आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील गट.

या दोन्ही गटांचे अस्तित्व कायम ठेवायचे असेल तर  आमदार आणि माजी आमदारांना निवडणुकीत लढवल्याशिवाय पर्याय उरत नाही. हिच राजकीय अपरिहार्यता पडळकर गटाची देखील आहे.
महत्वाचे म्हणजे  बाबर विरोधकांना गेल्या पाच वर्षात एकत्र आणण्याचे काम खासदार पाटील यांनी नेटाने केले होते. मात्र आता खासदार पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत बाबर यांना बळ देणार असल्याची जाहीर ग्वाही दिली आहे. या सार्‍यामुळे  मतदारसंघात राजकीय पटलावर संभ्रमावस्था आहे.