Wed, Jul 08, 2020 15:49होमपेज › Sangli › शाळकरी मुलीवर ब्लेडने वार

शाळकरी मुलीवर ब्लेडने वार

Published On: Apr 08 2018 2:15AM | Last Updated: Apr 08 2018 12:40AMजत : प्रतिनिधी 

नववीत शिकणार्‍या एका मुलीच्या गळ्यावर कृष्णा जालिंदर पिसाळ (वय 25, रा. सातारा रोड, जत) या तरुणाने शनिवारी एकतर्फी प्रेमातून ब्लेडने वार केले. या हल्ल्यात ती मुलगी गंभीर झाली. या घटनेनंतर पिसाळ याने स्वत:चा गळा चिरला व हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. परीक्षेच्या कालावधीत हा प्रकार घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मुलीवरील हल्ल्याचा प्रकार सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडला. तिच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिसाळ याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वार्षिक परीक्षा सुरू असल्याने ती मुलगी दहा वाजण्यापूर्वीच शाळेकडे गेली होती. त्यानंतर ती जवळच असलेल्या मैत्रिणीच्या घराकडे निघाली होती. त्यावेळी तिच्या पाळतीवर असलेल्या कृष्णा पिसाळ याने तिचा पाठलाग केला.

दत्त कॉलनीत कृष्णा याने  मुलीस अडविले. तिला तो लग्‍नाची मागणी घालत होता. मात्र तिने  नकार दिल्याने त्याने सुरूवातीस तिच्याशी झटापट केली. नंतर ब्लेडने तिचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या गळ्यावर ब्लेडचे तीन वार झाले आहेत. एक वार खोलवर गेला आहे.

या घटनेनंतर मुलगी रक्‍ताच्या थारोळ्यात पडली. हा प्रकार लक्षात येताच लोकांची गर्दी झाली.महांतेश मांगलेकर व दत्ता साबळे या सामाजिक कार्यकर्त्यांनी मुलीस मोटारसायकलवरून जत ग्रामीण रूग्णालयात नेले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर खासगी रूग्णालयात तिला दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिची प्रकृती गंभीर आहे.

पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार रूग्णालयात गेले. त्याठिकाणी मिळालेल्या माहितीच्या आधारे हल्‍लेखोर पिसाळ याचा शोध घेण्यास सुरूवात केली.  पिसाळ मोटारसायकलवरून पसार झाला होता. त्याचे घर, मित्र यांच्याकडे पोलिसांचे पथक चौकशी करीत होते. दरम्यान तो अंबाबाई मंदीर परिसरातील वनीकरणामध्ये जखमी अवस्थेत पडल्याचे नातेवाईक व पोलिसांना समजले. पोलिस तिथे पोहोचले. कृष्णा याने स्वत:च्या डाव्या हाताची नस कापल्याचे व ब्लेडने गळा चिरल्याचे दिसून आले. गंभीर जखमी झाल्याने तो रक्‍ताच्या थारोळ्यात पडला होता. 

सुरूवातीस त्याला जतच्या ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्याला उपचारासाठी मिरजेला हलविण्यात आले. त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी पिसाळ याने हल्ल्यासाठी वापरलेले ब्लेड, मोबाईल, मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. मुलगी व हल्‍लेखोर दोघेही गंभीर जखमी असल्याने त्यांचे तपास नोंदविण्यात आले नाहीत. घटना व परिस्थितीनुसार पोलिसांनी  पिसाळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

पिसाळचा शाळा परिसरात वावर

हल्‍लेखोर पिसाळ काही महिन्यांपूर्वी चायनीजचा गाडा चालवित होता. सध्या तो गवंडीकाम करीत होता. मात्र त्याचा नेहमी शाळेच्या परिसरात वावर होता. त्याला काही शिक्षकांनी समजही दिली होती. तो काही महिन्यांपासून या मुलीला त्रास देत  असल्याची चर्चा आहे.

निर्भया पथक कुचकामी

शाळकरी मुलीवर हल्‍ला झाल्यानंतर जतमधील निर्भया पथकाच्या कामकाजाबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळा व सोलनकर चौक याठिकाणी नेहमीच शाळकरी मुलींच्या छेडछाडीचे प्रकार होतात. पालक व शाळांतर्फेही अनेकदा पोलिसांत तक्रारी केल्या. मात्र या ठिकाणच्या रोडरोमिओंवर कारवाई  झालेली नाही. त्याच परिसरात हल्ल्याची गंभीर घटना घडली आहे. त्याबद्दल अनेक पालक व शिक्षकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्‍त केली आहे.

 

Tags : sangli, sangli news, Jat, crime, school girl, attack,