Mon, Jul 06, 2020 05:11होमपेज › Sangli › ‘हातकणंगले’चा  निकाल धक्कादायक असेल : सदाभाऊ खोत

‘हातकणंगले’चा  निकाल धक्कादायक असेल : सदाभाऊ खोत

Published On: Apr 17 2019 2:12AM | Last Updated: Apr 16 2019 10:47PM
इस्लामपूर : वार्ताहर 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकाल धक्‍कादायक असेल,  असे भाकित कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी  आष्टा येथे पत्रकार बैठकीत बोलताना व्यक्‍त केले. 

ना. खोत म्हणाले, याआधी शेट्टी हे  करपलेल्या चेहर्‍यांना बरोबर घेऊन मी टोमॅटोसारखे गाल असणार्‍यांच्या विरुद्ध लढत आहे,   असे सांगायचे. तेच शेट्टी आता करपलेल्या चेहर्‍यांना विसरून टोमॅटोची चव चाखायला तिकडे गेले आहेत. त्यामुळे याआधीच्या निवडणुकीप्रमाणेच ही निवडणूकही सामान्य जनता विरुद्ध नेते अशीच आहे. यामध्ये सामान्य जनतेचाच विजय होईल. शेट्टी यांना शेतकर्‍यांशी काहीही देणे-घेणे नाही. त्यांना फक्‍त खुर्ची प्यारी आहे. त्यामुळेच ते प्रत्येक  निवडणुकीत वेगळी भूमिका घेतात. 

ते म्हणाले, गेल्या 10 वर्षांत शेट्टी यांनी मतदारसंघाचा किती विकास केला? किती नवे उद्योग आणले? किती तरूणांच्या हातांना काम दिले? महिलांसाठी   कोणते कार्य केले? बहुजन, ओबीसी, मुस्लिम समाजासाठी काय केले?  याचे त्यांच्याकडे उत्तर नाही. ते पोळ्याच्या सणाप्रमाणे दरवर्षी 15 दिवस ऊस आंदोलनाचा सण साजरा करतात. चर्चेतून प्रश्‍न सुटत असतानाही केवळ फोटोसेशनसाठी  आंदोलनाचे नाटक करतात. त्यानंतर सरकारकडे जाऊन ‘माझ्यामुळेच सरकार नमलेे’, अशी डरकाळी फोडतात. सरकारची चर्चेची तयारी असते; मात्र  आंदोलनापूर्वी ते कधीच चर्चेला येत नाहीत, असेही ना. खोत म्हणाले. राहुल महाडिक, वैभव शिंदे, अमोल पडळकर, वीर कुदळे, स्वरुपराव पाटील  यावेळी उपस्थित होते.

भीतीने पडळकरांना तिकीट नाकारले...

सांगलीत  स्वाभिमानीतर्फे  गोपीचंद पडळकर  यांची  उमेदवारी  कोल्हापूरातील बैठकीत निश्‍चित झाली होती. मात्र, पडळकर निवडून आल्यानंतर  आपल्याला वरचढ होतील या भीतीने त्यांचे तिकीट ऐनवेळी कापून ते विशाल पाटील यांना दिले. यामागे शेट्टी यांना त्यांच्या मतदारसंघातील वसंतदादा गटाची मते मिळून आपला विजय सोयीस्कर करण्याचा डाव होता. या सर्वामध्ये सांगलीतील काँग्रेसही खा. शेट्टी यांनी संपविली आहे, असा आरोपही  खोत यांनी केला.