Sat, Jan 18, 2020 06:31होमपेज › Sangli › रस्ते, ड्रेनेजचा प्रश्‍न नेहमीच गंभीर

रस्ते, ड्रेनेजचा प्रश्‍न नेहमीच गंभीर

Published On: May 26 2018 12:51AM | Last Updated: May 25 2018 7:57PMमिरज : जालिंदर हुलवान

सांगली, मिरज, कुपवाड  महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून कोट्यवधीचा निधी कागदोपत्री मिरजेत आला; पण शहराचा विकास काही झालाच नाही. नव्या प्रभाग रचनेनुसार मिरजेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये आजही अनेक रस्ते खराब आहेत. ड्रेनेजचा प्रश्‍न गंभीर आहे. कचरा गाड्या नाहीत. मिरजेत प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण अशी चार आरक्षणे आहेत. प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत.  संजय गांधीनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन झालेले नाही. पक्की घरे बांधून तयार आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन मंत्री रवींद्र वायकर यांनी या ठिकाणी भेट देऊनही त्यांना अद्याप पक्की घरे मिळालेली नाहीत. ईदगाहनगर, गणेशनगर, शिवतीर्थ कॉलनी या परिसरामध्ये ड्रेनेज करण्यात आले. पण अद्याप ते जोडले नसल्याने ड्रेनेज व्यवस्था असून नसल्यासारखी आहे. ईदगाहनगर भागात पिण्याच्या पाण्याची समस्या   कायम आहे. गणेशनगर, रामकृष्ण पार्क भागात दिवसभर पाणी असते. मात्र ते पाणी खूपच कमी दाबाने येते. 

या प्रभागामध्येच मिरजेतील सर्वात मोठा रस्ता आहे. हा शंभर फुटी रस्ता अस्तित्वात आल्यापासून कधीच दुरुस्त करण्यात आला नाही. या रस्त्यावरून मोठी वर्दळ असते. मात्र रस्ताच खराब असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होतो. या रस्त्यावर बेथेस्दा व पाठीमागील बाजूस अल्फोन्सा स्कूल आहे. या दोन्ही शाळांसमोरील रस्ते खराब आहेत. शिवतीर्थ कॉलनी, रामकृष्ण पार्क, गणेशनगर या भागात कचरा उठावासाठी घंडागाडी नाही. कचरा टाकण्यासाठी  कंटेनर नाही.  रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागतो. याच प्रभागामध्ये मिरज एमआयडीसी व गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीचा भाग येतो. मात्र या वसाहतीकडे पालिका कारभार्‍यांनी दुर्लक्ष केले. मिरज एमआयडीसी येथील रस्ते व दिवाबत्तीचा प्रश्‍न राज्यशासनाने मिटविला. पण मराठे वसाहतीमधील सर्व रस्त्यांची वाताहत झाली आहे. येथे मतदार नसल्याने दुर्लक्ष होते, अशी नेहमीचीच ओरड आहे.

समस्या प्रभागाच्या

परिसर : सेवासदन हॉस्पिटल, एमआयडीसी रस्त्याकडून वॉन्लेस रस्ता, संजयनगर वसाहत, कमानवेस.