Mon, Dec 16, 2019 10:54



होमपेज › Sangli › सांगलीत कुंटणखाना; दोघींवर गुन्हा

सांगलीत कुंटणखाना; दोघींवर गुन्हा

Published On: Oct 29 2018 12:49AM | Last Updated: Oct 28 2018 11:35PM



सांगली : प्रतिनिधी

शहरातील काळ्या खणीजवळ असलेल्या प्रेमनगर येथील वेश्या वस्तीवर शनिवारी सायंकाळी पोलिसांच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षातर्फे छापा टाकण्यात आला. बांगलादेश, नेपाळ, झारखंड, राजस्थान येथील महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून कुंटणखाना चालवल्याप्रकरणी दोन महिलांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी परराज्यांतील दहा पीडित महिलांची  सुटका करण्यात आली.

माला मादर, गोदा आवळे अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. प्रेमनगर येथे या दोघीही संशयित पश्‍चिम बंगाल, नेपाळ सीमा भाग, कर्नाटक, मुंबई येथून महिला, मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणून कुंटणखाना चालवत असल्याची माहिती जाधव यांना मिळाली होती. त्यानंतर जाधव यांनी शनिवारी सायंकाळी पथकासह प्रेमनगर परिसरात छापा टाकला. यावेळी संशयावरून 22 वारांगनांना ताब्यात घेण्यात आले होते.  ताब्यात घेतलेल्या महिलांकडे रविवारी पहाटेपर्यंत चौकशी सुरू होती. त्यांच्या चौकशीत बांगलादेश, नेपाळ, झारखंड, राजस्थान येथून जबरदस्तीने आणलेल्या दहा महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर  माला मादर व गोदा आवळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. 
अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाचे परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, सहाय्यक निरीक्षक विद्या जाधव, उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, निवास माने, दीपक परीट, भगवान नाडगे, विकास पाटणकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.