Mon, Jul 13, 2020 08:25होमपेज › Sangli › सांगलीत पक्ष अन् इच्छुकांची लगीनघाई सुरू

सांगलीत पक्ष अन् इच्छुकांची लगीनघाई सुरू

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 26 2018 8:39PMसांगली : अमृत चौगुले

महापालिकेची आचारसंहिता जाहीर होताच पक्षीय पातळीवर मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सर्वच पक्षांचे अधिक पर्याय उपलब्ध असल्याने इच्छुकांची संख्याही यावेळी अधिक वाढली आहे. त्यामुळे आता पॅनेल पध्दतीतून संधीसाठी इच्छुकांची धावाधाव सुरू झाली आहे. दि. 4 ते दि.11 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानुसार प्रबळ दावेदारांची पळापळ आणि वापळवी सुरू होईल. यादृष्टीने पक्षीय बैठका आणि इच्छुकांची लगीनघाई सुरू झाली आहे.

महापालिका स्थापनेपासून महाआघाडीची एक टर्म वगळता काँग्रेस-राष्ट्रवादीचीच महापालिकेवर सत्ता आहे. परंतु यावेळी मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर भाजप, शिवसेना, जिल्हा सुधार समिती-आपसारख्या विविध पक्षांनी आव्हान उभे केले आहे. यामुळे निवडणूक बहुरंगी होणार हे स्पष्ट आहे.साहजिकच यावेळी इच्छुकांची संख्याही त्या तुलनेत वाढली आहे. ती हजारांच्या घरात गेली आहे. सर्वच पक्षांनी इच्छुकांकडून अर्जही मागविले आहेत. पक्षनेत्यांनी इच्छुकांना जनसंपर्काच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रत्येकाने प्रभागनिहाय दोन-तीन फेर्‍याही पूर्ण केल्या आहेत. सर्वच पक्षीय नेत्यांनी महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी अधिकाधिक प्रबळ दावेदारांना उमेदवारीची संधी देण्यावरही खल सुरू झाला आहे.

काँग्रेसनेते डॉ. पतंगराव कदम व मदन पाटील यांच्या निधनानंतर होणारी महापालिका निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची आहे. यादृष्टीने काँग्रेसनेत्या जयश्री पाटील,  आमदार मोहनराव कदम, डॉ. विश्‍वजित कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवानेते विशाल पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी आपापल्या समर्थकांना संधी देण्यासाठीही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यामध्ये महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार यांनीही प्रत्यक्ष इच्छुकांची तुल्यबळ ताकद अजमावून उमेदवारी आणि आघाडीचा निर्णय घेण्याची भूमिका ठेवली आहे. काँग्रेसची सत्ता कायम ठेवण्यासाठी झालेल्या कामांचे मार्केटिंग करण्याबरोबरच भाजपच्या केंद्र, राज्यातील सत्तेला टार्गेट करण्यात येणार आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे नूतन प्रभारी व पक्षाचे महासचिव खासदार मल्लिकार्जुन खारगे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची फौज सांगलीला ताकद देणार आहे. महापालिका निवडणुकीची जबाबदारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याकडे दिलेली आहे. 

अर्थात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसकडून राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीची चर्चा सुरू आहे. आघाडीचे प्रयत्न सुरू ठेवतच राष्ट्रवादीकडून विकासाचा अजेंडा घेऊन सत्ता सोपवण्याचे आवाहनही सुरू ठेवले आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील आदिंनीही आघाडीचा आग्रह धरला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा खल सुरू असला तरी दोन्हीकडून इच्छुकांची संख्याही मोठी आहे. शिवाय काँग्रेसकडूनच पाठपुरावा करूनही आघाडीचा हात पुढे आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीनेही ताकदीने लढण्याची भूमिका ठेवली आहे. यासाठी  माजी मंत्री अजित पवार, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे आदींसह नेत्यांची फौज येणार आहे.

भाजपनेही केंद्र, राज्य, नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समितीपाठोपाठ महापालिकेवरही झेंडा फडकविण्याची तयारी केली आहे. यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घातले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांनीही यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला टार्गेट केले आहे. यासाठी खासदार संजय पाटील, मनपा निवडणुकीचे नेतृत्व करणारे शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार यांनी मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे.  सोबतच त्या पक्षातील आजी-माजी नगरसेवक, प्रबळ कार्यकर्त्यांना पक्षप्रवेशासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यामध्ये मिरजेतील 13 आजी-माजी नगरसेवकांना पक्षात घेऊन एक झलक दाखविली आहे. पुढे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदींसह अनेक मंत्र्यांची फौज प्रचार आणि नियाजनासाठी पूर्ण ताकद पणाला लावणार आहे. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीसह समविचारी आघाडीचा सूर पुढे आला आहे. त्यामुळे भाजपनेही स्व:बळाचा नारा सोडून महायुतीतील रिपब्लिकन पक्ष, शिवसेना, रासपसह अन्य पक्षांनाही सोबत घेण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु जागावाटपात हे कसे गणित जमेल यावर ते ठरणार आहे.

शिवसेनेकडूनही माजी आमदार संभाजी पवार गटाचे पृथ्वीराज पवार, नगरसेवक गौतम पवार, नगरसेवक व नेते शेखर माने, जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांच्यासह पदाधिकार्‍यांनी स्व:बळावरच निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे. संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे, संपर्कनेते गजानन कीर्तीकर यांनीही ताकद पणाला लावली आहे. पुढच्या टप्प्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपासून अनेक मंत्र्यांची फौज आणि रसद मिळणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे शिवसेनाही प्रबळ दावेदार ठरणार आहे.स्थानिक पातळीवर जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे यांनी आपच्या सहकार्याने सत्ता परिवर्तनासाठी चळवळ सुरू केली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे, तानाजीराव जाधव यांनी नेहमीप्रमाणे मनपात प्रवेशासाठी धडक देण्यासाठी तयारी सुरू ठेवली आहे. डाव्या पक्षांनीही प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

अर्थात या सर्वांच्या माध्यमातून इच्छुकांच्या ओढाओढीची रस्सीखेच आता सुरू होणार आहे. सोबतच इच्छुकांकडूनही जनतेला पसंत पडेल, पक्षीय बळ मिळेल अशा पक्षांकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यातून आरक्षण आणि चार सदस्यीय पॅनेलमध्ये जे सोयीस्कर ठरेल त्याकडेच सर्वांचा कल राहील. अर्थात यासाठी प्रमुख पक्षांनी इच्छुकांचे अर्जही मागवून घेतले आहेत. आता यातून आघाडी आणि प्रबळ दावेदारांची यादी करण्यासाठी तयारी सुरू झाली 
आहे. 

दि.4 जुलैपासून उमेदवारी अर्ज भरणा सुरू होईल. त्यामुळे  सर्वच पक्षांकडून इच्छुकांतील प्रभागनिहाय तुल्यबळ प्रबळ दावेदार निवडीसाठी आता बैठका सुरू झाल्या आहेत. यातून संधी न मिळाल्यास पुन्हा गटबाजी उफाळणार हे स्पष्ट आहे.  उमेदवारी अर्जासोबतच पक्षाचा एबी फॉर्म बंधनकारक आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत 11 जुलै अर्ज भरणा सुरू राहणार आहे. अर्थात खेळ 17 तारखेला अर्ज माघारीपर्यंत सुरूच राहील. त्यानुसार 17 तारखेलाच खर्‍या अर्थाने तुल्यबळ लढती ठरणार आहेत. 

आजी-माजी नगरसेवक प्रबळ दावेदार

महापालिका निवडणुकीमध्ये प्रामुख्याने स्थानिक समस्यांचा उहापोह अद्यापही सुरू झालेला नाही. इच्छुकांमध्ये आजी-माजी नगरसेवक प्रबळ दावेदार हे साहजिकच सर्वच पक्षातून दल बदलून उतरणार आहेत. यामुळे मागे झालेल्या  कारभाराचा,भ्रष्टाचाराचा उहापोह त्यांच्याही अंगलट येऊ शकतो. त्यामुळे स्थानिक प्रश्‍नांना बगलच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीकडून भाजप, शिवसेनेला विरोध करताना केंद्र, राज्य सरकारवर टीका रंगणार आहे. दुसरीकडे भाजप-शिवसेनेकडून मात्र स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचारावर लक्ष केंद्रीत करतानाही सांभाळूनच टीका होईल.