Sat, Jul 04, 2020 00:24होमपेज › Sangli › झेडपी शाळांची पटसंख्या 3677 ने घसरली

झेडपी शाळांची पटसंख्या 3677 ने घसरली

Published On: Sep 01 2019 1:50AM | Last Updated: Sep 01 2019 1:50AM

file photoसांगली : उध्दव पाटील

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या 3 हजार 677 ने घटली आहे. दहाहून कमी पटाच्या शाळा तब्बल 109; तर अकरा ते वीस पटसंख्येच्या शाळा 290 आहेत. शिक्षकांपासून ते शिक्षणाधिकारी-सभापतीपर्यंतच्या सर्व घटकांनी ही बाब गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. शिष्यवृत्ती, एनएमएमस परीक्षेत जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी चमकत आहेत. सुविधा आणि गुणवत्ता वाढत आहे.  

जिल्हा परिषद शाळा आणि विद्यार्थी संख्या घसरत आहे. आठ वर्षांपूर्वी शाळांची संख्या 1 हजार 710 होती. ती आज 1 हजार 691 आहे. 19 शाळा बंद झाल्या; तर विद्यार्थी संख्या 28 हजार 774 ने कमी झाली आहे. दोन ते दहा विद्यार्थी असलेल्या द्विशिक्षकी शाळा 109 आणि अकरा ते वीस विद्यार्थी असलेल्या शाळा 290 पर्यंत गेल्या आहेत. शिक्षकांची रिक्त पदेही आहेत. शाळा आहेत पण, विद्यार्थी आणि शिक्षक नाहीत, अशी स्थिती आहे. 

गुणवत्ता मर्यादित शाळांपुरती..!

अलिकडील काही वर्षात जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्ता वाढत होती. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा गेल्या दोन वर्षांचा निकाल पाहता राज्य गुणवत्ता यादीतील पहिल्या दहापैकी आठ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांचे आहेत. गुणवत्ता आणि सुविधा वाढत आहे. इंग्रजी माध्यमाच्या काही विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या काही शाळांनी खासगी शाळांपुढे आव्हान निर्माण केले आहे. 

इंग्रजी शाळांची वाहने वस्तीवर

ग्रामीण भागात खासगी इंग्रजी शाळांची संख्या वाढत आहे. या खासगी शाळांच्या बसेस वाडी-वस्तीवर फिरून विद्यार्थ्यांची ने-आण करत आहेत. प्रवासाची सोय म्हणूनही काही  पालक आपल्या पाल्याला खासगी शाळेत घालत असल्याचे दिसत आहे. पटसंख्या कमी होण्यास घटता जननदर हे कारणही पुढे केले जाते. पण शाळांची गुणवत्ता वाढली तर पटसंख्या वाढते हे  जिल्हा परिषदेच्याच काही शाळांनी दाखवून दिलेले आहे. त्यामुळे पटसंख्या वाढीसाठी शिक्षक ते शिक्षणाधिकारी या  यंत्रणेतील सर्व घटकांनी प्रभावीपणे आणि प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. 

जिल्हा परिषदेच्या कमी पटाच्या शाळा हे शासनाच्या बेजबाबदार धोरणाचे फलित आहे. विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळांना मोठ्या प्रमाणावर दिलेली मान्यता कारणीभूत आहे. कमी पटाच्या शाळा बंद केल्या तर गोरगरिबांचे शिक्षण बंद होईल. कमी पटाच्या शाळा बंद करू नये. शिक्षक व अधिकार्‍यांनीही जास्त परिश्रम घेऊन गुणवत्ता वाढवत पट टिकवला पाहिजे. 
- जितेंद्र पाटील, पक्षप्रतोद  
  काँग्रेस (जिल्हा परिषद)

रिक्त पदे 866; शासन जबाबदार

जिल्हा परिषद शाळांकडील वरिष्ठ मुख्याध्यापक, उपशिक्षक, विषय शिक्षकांची रिक्त पदे 866 आहेत. शाळांच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत आहे. शाळेत शिक्षकच नसतील तर विद्यार्थी कसे वाढतील? पवित्र प्रणालीद्वारे भरतीसाठी 515  उपशिक्षक, विषयशिक्षकांची निवड यादी आली आहे. त्यातील 510 उमेदवारांनी कागदपत्रे सादर केली आहेत. भरतीनंतरही जिल्हा परिषद शाळांकडे शिक्षक, मुख्याध्यापकांची रिक्त पदे मोठ्या संख्येने असणार आहेत. 

10 हून कमी पटाच्या शाळा

    आटपाडी-23, जत- 30, वाळवा-8, क.महांकाळ- 8,खानापूर-10, शिराळा- 19, तासगाव-5, कडेगाव- 6

 
जिल्हा परिषद शाळा... एक दृष्टीक्षेप       
वर्ष    शाळा संख्या    पटसंख्या    पट संख्येतील घट       
सन 2012-13    1710    146231    --       
सन 2013-14    1710    139982    6249       
सन 2014-15    1710    136125    3857       
सन 2015-16    1705    130863    5262       
सन 2016-17    1702    127474    3389       
सन 2017-18    1698    124306    3168       
सन 2018-19    1698    121129    3177       
सन 2019-20    1691    117452    3677