होमपेज › Sangli › वृक्ष लागवडीसह संवर्धनाचीही गरज

वृक्ष लागवडीसह संवर्धनाचीही गरज

Published On: Jul 05 2018 1:40AM | Last Updated: Jul 04 2018 11:09PMविटा : विजय लाळे

सध्या राज्य शासनाची शतकोटी वृक्ष लागवड मोहीम जोरात आहे.  मात्र गेल्या काही वषार्ंत  नित्य नियमाने जंगलांना वणवे, आगी लागण्याच्या अथवा त्या लावण्याच्या प्रकारातदेखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे फक्‍त झाडे लावून जबाबदारी संपत नाही तर त्यांची काळजी  घेण्याचीही तेवढीच गरज आहे. अन्यथा वृक्षलागवडीचा उपक्रम केवळ फार्स ठरेल, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.गेल्या काही वर्षांपासून वन मंत्रालय प्रतिवर्षी  शतकोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवित आहे.  तरी प्रत्यक्षात नेमके काय घडते आहे याकडे संबंधित विभाग कानाडोळा करीत असल्याची उलट सुलट चर्चा  आहे. राज्यात  ‘हरित महाराष्ट्र’ ही  संकल्पना राबवली जात आहे. गेल्या  वर्षांपासून वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रतीवर्षी वन मंत्रालय विविध योजना जाहीर करते. 

यावर्षी  दि. 1  ते दि.  7 जुलै अखेर वृक्ष लागवडीचा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. सध्या राज्यभरात वनाच्छदनाचे प्रमाण 16  टक्के इतके आहे. त्याच वेळी देशाचे उद्दिष्ट हे 33 टक्के वनाच्छादनाचे आहे. दोन वर्षांपूर्वी 2016 मध्ये पहिल्या वर्षी 2 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यावेळी तब्बल 2 कोटी 83 लाख वृक्ष राज्यभरात लावल्याचा दावा शासनाने केला होता. रोपवन स्थळ, रोपवाटिका स्थळ तसेच लावण्यात येणार्‍या रोपांची स्थिती ऑनलाइन पद्धतीने संनियंत्रित केली जात असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. पुढील तीन वर्षांत राज्यात50 कोटी वृक्ष लागवड करावी असे एकूणच धोरण आणि उद्दिष्ट ठरविण्यात आले.  सन 2017 मध्ये 4 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य होते. तर यावर्षी  13 कोटी  आणि  2019 मध्ये  33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच येत्या तीन वर्षांत 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. 

हे साध्य करण्यासाठी शासनाच्या प्रत्येक विभागाला वृक्ष लागवडीचे  उद्दिष्ट देण्यात आले आहे. पहिल्या वर्षी  वृक्ष लागवडीचे अभियान जोरदार राबविली गेली, त्यावेळी चार कोटी वृक्ष लागवड झाल्याचा दावा केला गेला. यासाठी माळरान, डोंगराळ, वनजमिनी, गाय रान, शासनाच्या जमिनी, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंवर झाडे लावण्यात येत आहेत. मात्र  अनुभव असा आहे, की एकदा रोप  लावल्यानंतर त्याकडे संबंधित यंत्रणा अगर कोणीही लक्ष देताना दिसत नाही. एकदा का झाड लावले, की आपली जबाबदारी संपली असा सर्वसाधारण समज झाला आहे. लावलेले झाड  जगते का नाही हे बघणारी कोणतीही यंत्रणा शासनाकडे  नाही. परिणामी ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे दर वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर वृक्ष जोमात लागवड होते; परंतु दरवर्षी फेब्रुवारी ते मे अखेरपर्यंत हजारो हेक्टर जंगल जमीन, माळरान भाग आगीत भस्मसात होतो. मे, जून 2018 मध्ये   अशा आगीच्या अनेक घटना एकट्या सांगली जिल्ह्यातच झाल्या आहेत.खानापूर तालुक्यात विशेषतः वनविभागाच्या डोंगराळ जमिनीवरील जंगलांना आगी लागण्याचे किंवा  लावण्याचे प्रमाण वाढले आहे. यात फेब्रुवारी ते मे या महिन्यांच्या हा काळ असल्याचे निदर्शनास आले आहे. 

हा काळ एकतर उन्हाळ्याचा असतो. तापमान वाढलेले असते. तसेच या दरम्यान यात्रा, जत्रा उरुस होतात. अनेकदा  अशा यात्रांत दगडांच्या चुली मांडून जेवण बनवले जाते. नंतर अनेकदा आग किंवा विस्तव तिथेच राहिल्याने  जंगलांना वणवे लागण्याचे प्रसंग घडलेले आहेत. विशेष म्हणजे काही विघ्नसंतोषी  मुद्दाम  आगी लावतात अशा तक्रारी आहेत. यात हजारो एकर जमिनीवरील  झाडे, झुडपे जळून जातात. या वर्षी एप्रिल महिन्यात लेंगरे, भूड, कलेढोण, देविखिंडी परिसरातील  मोठ्या डोंगराला आग लागून शेकडो हेक्टर झाडी नष्ट झाली. गतवर्षी विट्याजवळच्या सुळकाईच्या डोंगराला आग लागून 12 ते 13 हेक्टर परिघातील झाडी भस्मसात झाली. 

वनसमित्यांना अधिकार नाहीत

अशा आगींमुळे वेगवेगळ्या प्रकारचे गवत, विविध मौल्यवान औषधी वनस्पतीही नष्ट होतात. यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. नाही म्हणायला गावागावात वनसमित्या  वनविभागाने नेमल्या आहेत, मात्र त्यांना कोणतेही अधिकार नाहीत. त्यामुळे  त्या कागदावरच राहिल्या  आहेत.

प्रबोधनात्मक बैठकांची सूचना 

खानापूर-आटपाडी  विधानसभा मतदार संघातील असे प्रकार रोखण्यासाठी आता आमदार अनिलराव बाबर यांनी वन, कृषी आणि महसूल विभाग यांना डिसेंबरनंतर गावोगावी प्रबोधनात्मक बैठका घ्याव्यात अशा सूचना दिल्या आहेत. यात वनसमित्यांचे अधिकार आणि जबाबदारी याबाबतही सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. आगीच्या  घटनांतील दोषींबाबत  कडक कारवाई करावी, अशा सूचनासुद्धा बाबर यांनी दिल्या आहेत.