Mon, Jul 06, 2020 23:58होमपेज › Sangli › जिल्ह्याला कवींची गौरवशाली परंपरा

जिल्ह्याला कवींची गौरवशाली परंपरा

Published On: Mar 21 2018 1:43AM | Last Updated: Mar 20 2018 9:38PMसांगली : विवेक दाभोळे 

.सृजनशीलता, भावना यांचे प्रतिबिंब असलेल्या कविमनांचा गौरव करण्यासाठी प्रतिवर्षी 21 मार्च हा दिवस जागतिक कवी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सांगली जिल्ह्याला देखील प्रतिभावंत कवींची गौरवशाली परंपरा आहे. याला देखील या निमित्ताने उजाळा मिळतो आहे.  

प्राचीन कालापासून, अगदी लेखनाचे साहित्य, लेखन कला देखील  अस्तित्वात  नव्हती तेव्हापासून काव्यकला चांगली रूजली होती.  समाजातील विशेषत: मौखिक परंपरेसाठी काव्यकलेचा, कवितांचा मोठा वाटा राहिला आहे. याचेच भान ठेवून कविजनांच्या सन्मानार्थ युनेस्कोने आपल्या 30 व्या अधिवेशनात सन 1999 मध्ये प्रतिवर्षी 21 मार्च हा दिवस कवी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. 

भारतीय परंपरेची महती स्पष्ट करणारे रामायण, महाभारतासारखे ग्रंथ हे महाकाव्यच आहेत. भारतीय कवीपरंपरेत रविंद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली काव्यसंग्रहाने तर नोबेल पुरस्कारावर आपले नाव कोरले होते. अगदीच पाहिले तर केशवसुतांनी त्या काळी फुंकलेल्या ‘तुतारी’ने तर अवघे मराठी काव्य विश्‍व खळबळून गेले. रविकिरण मंडळाच्या माधव ज्युलियन, कवी गिरीश, मर्ढेकर यांनी तर मराठी कविता विश्‍वाला नवीन आयाम मिळवून दिला. ‘ऐल तटावर..पैल तटावर..’, श्रावणमासी हर्ष मानसी, औदुंबर आदी कवितांतून अकाली गेलेले बालकवी तर मराठी कवीमनाचे आयडॉल ठरले. रेव्हरंड टिळक याच प्रवाहातील! 

सांगली जिल्ह्याला देखील अशाच सृजनशील, संवेदनशील कवींची परंपरा आहे. सन 1920 च्या दरम्यान, मराठी कवितांचा जमाना गाजविला तो कवी गिरीश यांनी! कवी गिरीश हे सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात प्राध्यापक होते. शंकर केशव कानेटकर हे त्यांचे संपूर्ण नाव. नाटककार वसंत कानेटकर यांचे ते वडील! कवी गिरीश या नावाने त्यांनी कविता लिहिल्या, कवी यशवंत आणि गिरीश यांनी एकत्रितरित्या प्रसिद्ध केलेल्या ‘यशोगिरी’ या काव्यसंग्रहाने त्याकाळी मराठी काव्यरसिकांच्या मनात स्थान पटकावल्याची आठवण ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन सांगतात. विशेष म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे हे गिरीश यांचे विद्यार्थी! पुढे सन 1940 च्या काळात सांगलीतील कवयित्री विमल काळे यांनी मराठी कविताविश्‍वात आपले असे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्या काळी कमालीचे अपू्रप असलेल्या रेडिओवर विमल काळे यांची कविता, गाणी वाजली नाहीत असा एखादाच दिवस ठरावयाचा! साधारणपणे साठच्या दशकात सांगलीनजीकच्या हरिपूरचे सुपुत्र अशोक जी. परांजपे यांनी तर गीतकार, नाटककार म्हणून मराठी विश्‍वात आपले असे एक स्थान निर्माण केले होते. याच समकालखंडात श्रीरंग विष्णू जोशी यांनीही मराठी कविता विश्‍वात मोलाचे योगदान दिले.

पुढे मिरजेतील बन्याबापू कमलतूरकर, सरोजिनी कमलतूरकर यांनी देखील मराठी काव्यविश्‍व अधिक समृद्ध होण्यासाठीचे योगदान दिले. तर याचकाळात श्रीनिवास शिंदगी यांनी देखील बालनाट्यांबरोबरच काव्यविश्‍वात देखील आपल्या कवितांमधून जिल्ह्याच्या काव्यपरंपरेचा प्रवाह वेगवान आणि समृद्ध होण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. जिल्ह्याच्या काव्यपरंपरेचा हा धावता आढावा ठरावा. आता अलीकडील जमान्यात देखील सांगली जिल्हा काव्यविश्‍वात देखील आघाडीवर आहे. 

Tags : Sangli, Sangli News, glorious traditionm, poets, district