Mon, Jul 13, 2020 23:25होमपेज › Sangli › 'ऑक्टोबर अखेर दुष्काळ जाहीर करणार'

'ऑक्टोबर अखेर दुष्काळ जाहीर करणार'

Published On: Oct 21 2018 2:21AM | Last Updated: Oct 21 2018 2:21AMयेळवी  : वार्ताहर

दुष्काळ निवारणासाठी केंद्र  सरकारच्या  मदतीची  वाट न पाहता राज्य सरकारने उपाययोजना करणे सुरू केले आहे.  राज्यात ऑक्टोबरअखेर दुष्काळ जाहीर करणार आहे, अशी  माहिती  राज्याचे महसूलमंत्री  चंद्रकांत पाटील यांनी दिली.जत तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने जत येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

मंत्री  पाटील म्हणाले,  महाराष्ट्रात  हजार  गावांत जलयुक्त शिवार योजनेची कामे पूर्ण झाली  आहेत; मात्र या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे त्याचा लाभ झाला नाही. जत तालुक्यातील 42 गावांच्या पाण्याचा प्रश्‍न कायम आहे. त्यासंदर्भात कर्नाटकशी बोलणे करून महाराष्ट्रातून जादा पाणी सोडून कर्नाटकातून या 42 गावांना पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील  रस्त्यांसाठी मोठ्या 
प्रमाणात निधी दिला आहे. या निधीतून बरीच कामे पूर्णत्वास आली आहेत. राज्यात रस्त्यांसाठी सतराशे कोटींची तरतूद होती;  मात्र ती  वाढून आता सहा हजार कोटी करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारने एक लाख सहा हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे.  त्यातून 22 हजार किलोमीटर राष्ट्रीय मार्ग पूर्ण होत आले आहेत.

खा. संजय पाटील म्हणाले,  जत तालुक्यातील म्हैसाळ योजना पूर्ण करण्यासाठी भाजपचे सरकार कटिबद्ध आहे. राज्यात पंधरा वर्षे आघाडीचे सरकार होते. मात्र त्यांनी या तालुक्यासाठी काहीही दिले नाही.  आमदार विलासराव जगताप म्हणाले, जत तालुक्यात प्रचंड दुष्काळ पडला आहे. शासनाने तातडीने   दुष्काळ जाहीर करून सर्व सोयी-सवलती द्याव्यात. तसेच प्रशासकीय इमारत, नवीन बसस्थानक, म्हैसाळचे पाणी, विभाजन या तालुक्याच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात.

जत तालुक्यासाठी आजपासून मदत

ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहीर होणार आहे; पण जत तालुक्यासाठी रविवार, दि. 21 पासून टंचाईतून मदत मिळणार आहे. यामध्ये चारा छावण्या, वीज बिलात सवलत, शालेय विद्यार्थ्यांची फी माफ आदी सुविधा मिळणार आहेत, असे ना. चंद्रकांत पाटील म्हणाले.