Tue, Jul 14, 2020 03:26होमपेज › Sangli › चोरट्याचा मारहाणीत मृत्यू

चोरट्याचा मारहाणीत मृत्यू

Published On: Mar 13 2019 1:42AM | Last Updated: Mar 13 2019 1:42AM
मिरज : शहर प्रतिनिधी 

शेळीची चोरी करायला आलेल्याचा लोकांच्या बेदम मारहाणीत मृत्यू झाला. दादू हणमंत राठोड (वय 32, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिरजेतील कृष्णाघाट येथे मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला. याप्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. 

अरुण सिद्धप्पा व्हनमाने (वय 50), माणिक हरीबा शेंडगे (वय 50), बिरुदेव सोमा खरात (वय 25), सोमा बंडू खरात (वय 60), संजय दशरथ करांडे (वय 35), विष्णू आमसिद्ध करोडे (वय 35), आबासाहेब शंकर शेंडगे (वय 40), राजू मरिबा करांडे (वय 50, सर्व रा. कृष्णाघाट, निलजी-बामणी रोड, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस  एस. व्ही. चव्हाण यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

 कृष्णाघाट येथे  नितीन पाटील यांचे शेत आहे. शेताजवळच शेळी, बोकड बांधण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी त्या बोकडाची चोरी झाली. मात्र चोरटा सापडला नव्हता. त्यामुळे तेथील नागरिकांनी सोमवारी रात्री पाळत ठेवण्याचा निर्णय घेतला. रात्री त्यांनी झोपल्याचे सोंग घेतले. मध्यरात्रीच्या दरम्यान दादू राठोड  तेथे शेळी चोरण्यास आला. कुत्री भुंकली. त्यामुळे शेळी चोरताना त्याला नागरिकांनी पकडले. त्यानंतर सर्वांनी मिळून दादू राठोड याला  लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. 

त्याला लगेच मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तत्पूर्वी उपचारावेळी घडलेला हा प्रकार त्यानेच पोलिसांना सांगितला होता. मंगळवारी रात्री या प्रकरणी आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक कांबळे यांनी त्या आठ जणांना अटक केली. राठोड याच्या समवेत आणखी कोण होते याचा तपास पोलिस करीत आहेत.