Fri, Jul 10, 2020 18:20होमपेज › Sangli › पकडलेला गुन्हेगार पुन्हा पळाला!

पकडलेला गुन्हेगार पुन्हा पळाला!

Published On: Apr 06 2019 1:50AM | Last Updated: Apr 05 2019 11:28PM
सांगली : प्रतिनिधी

कवठेमहांकाळ येथे कर्नाटकातील व्यापार्‍याला अडवून त्याची सफारी जीप चोरून नेल्या प्रकरणातील फरारी संशयितास गुरुवारी अटक करण्यात आली होती. अमर ऊर्फ संतोष जयराम आटपाडकर (वय 27, रा. पिंपळवाडी, ता. कवठेमहांकाळ) असे त्याचे नाव आहे. कवठेमहांकाळ पोलिसांकडे त्याला ताब्यात देण्यात आले होते. शुक्रवारी वैद्यकीय तपासणीला नेल्यानंतर त्याने पोलिसांना  हिसडा मारून पलायन केले. 

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्‍त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी विविध गुन्ह्यांतील फरारींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक गुरुवारी इस्लामपूर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी अमर आटपाडकर परगावी जाण्यासाठी पेठ नाका येथे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने 19 मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास कवठेमहांकाळ येथून मोहम्मद अक्रम पाशा, मौलाअली कोरबू यांची सफारी गाडी अडवली. त्यानंतर त्याच्यासह त्याच्या साथीदारांनी दोघांनाही मारहाण करून त्यांची गाडी चोरून नेल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच उमेश नरळे, संतोष खोत यांना अटक केली आहे. आटपाडकर याला कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.   कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात आटपाडकर याला देण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी त्याला कवठेमहांकाळ पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते.त्यावेळी त्याने  पोलिसांना हिसडा मारून पलायन केले. या घटनेमुळे  पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.पोलिसांच्या एका पथकाने शर्थीने त्याला अटक करूनही पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे  गुन्हेगार पळून गेल्याची  चर्चा पोलिस दलात सुरू होती.

पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार

दरम्यान, अमर आटपाडकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खुनाचा कट, मारामारी, अवैधरीत्या शस्त्रे बाळगणे असे गंभीर गुन्हे कवठेमहांकाळ, सांगोला पोलिस ठाण्यात दाखल आहेत.