Sat, Jul 04, 2020 02:37होमपेज › Sangli › बंद पडलेल्या चळवळी पुन्हा सक्षम होतील : डॉ. बाबा आढाव

बंद पडलेल्या चळवळी पुन्हा सक्षम होतील : डॉ. बाबा आढाव

Published On: Oct 26 2018 12:53AM | Last Updated: Oct 25 2018 8:28PMसांगली :  गणेश कांबळे

जागतिकी करणानंतर भांडवलदारांनी सर्व चळवळी मोडीत काढून कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण सुरू केले आहे. असे असले तरी आमचा लोकशाहीवर विश्‍वास असून, या चळवळी पुन्हा एकदा सक्षम होतील, असा विश्‍वास ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी  दै. ‘पुढारी’ शी बोलताना व्यक्‍त केला. 

डॉ. आढाव हे सांगलीत एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. आढाव म्हणाले, 1991 मध्ये भारताने खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. आधीच्या काँग्रेस सरकारने व आताच्या भाजप सरकारने डाव्या चळवळी मोडीत काढल्या. आपल्याकडे खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण हे धोरण स्वीकारले, परंतु तंत्रज्ञान  स्वीकारले नाही. चीनमध्ये मात्र खुल्या आर्थिक धोरणाबरोबर त्यांनी तंत्रज्ञान स्वीकारले. म्हणून त्यांचे मोबाईल जगाच्या सर्व बाजारपेठांत दिसतात. भारतात मात्र तसे झाले नाही. त्याचा परिणाम म्हणून आपण तंत्रज्ञानासाठी दुसर्‍या देशांवर अवलंबून राहतो. परकियांकडे आपला देश गहाण टाकतो. त्यामुळे काहीजणांची प्रवृत्ती मात्र या देशाला लुटायचे आणि परदेशात जावून गुंतवणूक करायची, असे प्रकार वाढीस लागले आहेत. 
ते म्हणाले,खुल्या आर्थिक धोरणाचा आणखी एक तोटा म्हणजे मालक-कामगार हे नाते संपुष्टात आणले. कामगार कायद्यांमध्ये पाहिजे तसा बदल करून देशात सर्वत्र कंत्राटीकरण सुरू केले. कायम कामगारांऐवजी जॉब वर्कर, शिकाऊ कामगार ही संकल्पना सुरू झाली. त्याचा परिणाम म्हणजे कामगारांचे संरक्षण काढून घेतले.  सुविधा मिळत होत्या, त्या काढून घेण्यास सुरुवात केली. याकडे सरकार डोळेझाक करत आहे.  

सरकारने कामगारांना वार्‍यावर सोडले आहे. त्याचा परिणाम म्हणून सर्व कामगार चळवळी या मोडीत निघत आहेत. कामगारांना न्याय मिळत नाही. कामगारांच्या न्याय हक्कासाठी अजूनही कायदे आहेत. माथाडी कायदा, रोजगार हमीचा कायदा आहे. परंतु त्यांची अंमलबजावणी होत नाही. ते म्हणाले, सरकारने कामगारांची वाईट अवस्था केली आहे. गुन्हा केलेल्या कैद्यालाही सरकार पोसते, परंतु कामगाराला न्याय द्यायला तयार नाही. असंघटित कामगारांची अवस्था खूप वाईट आहे. त्यांना संघटित करण्याची जबाबदारी नेतृत्त्वाची आहे. त्यांनी  प्रामाणिकपणे काम करीत राहण्याची गरज आहे. कामगारांनी नवीन तंत्रज्ञान शिकून घेऊन परिस्थितीला तोंड देत राहिले पाहिजे. 

मंदिरातील संपत्ती देश उभारणीसाठी वापरा

डॉ. आढाव म्हणाले, देशाच्या विकासासाठी परकियांपुढे देश गहाण ठेवला जातो.  परंतु आपल्याच देशातील देवस्थाने, मंदिराकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. त्याकडे मात्र सरकार डोळेझाक करीत आहे. लोकांच्या घामातून या मंदिरांनी पैसा मिळविलेला आहे. तो जरी बाहेर काढला तरी देशात अनेक विकासाची कामे होतील. सरकारला बाहेरून देशाकडून कर्ज घेण्याची सुद्धा गरज भासणार नाही. मात्र  सरकार हे करीत नाही. तसेच शहरी नक्षलवादाबद्दल ते म्हणाले, सरकार शहरी नक्षलवादाच्या नावावर लोकशाहीचा खून करीत आहे. मात्र राज्यकर्त्यांनी  कोणत्याही भ्रमात राहू नये, जनता त्यांना बरोबर जागा दाखवेल.