होमपेज › Sangli › सांगलीत गुंडाच्या खुनाचा प्रयत्न फसला

सांगलीत गुंडाच्या खुनाचा प्रयत्न फसला

Published On: Jun 21 2019 1:33AM | Last Updated: Jun 20 2019 10:27PM
सांगली : प्रतिनिधी
जुना बुधगाव रस्त्यावरील संभाजीनगर येथील गुंड दशरथ पवार याच्या खुनाचा प्रयत्न फसला. पाच जणांच्या टोळीने त्याचा थरारक पाठलाग केला. मात्र तो एका घरात घुसल्याने बचावला. याच घरावर टोळीने केलेल्या हल्ल्यात महिलेसह दोघे जखमी झाले आहेत. पंचशीलनगरमधील दसरा चौकात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. 

याप्रकरणी करण पाटील, विकास गोसावी, अरबाज शेख, आकाश, सागर (पूर्ण नावे निष्पन्न नाहीत) यांच्याविरुद्ध रात्री उशिरा संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सर्वजण वाल्मिकी आवासमध्ये राहतात. ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, असे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच ते पसार झाले आहेत. हल्ल्यात जखमी झालेले बाबू मोसीन इनामदार (50) व त्यांचा मुलगा मोसीन (29) यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 माधवनगर रस्त्यावर कलानगर येथे रेल्वे रुळाजवळ तीन वर्षापूर्वी गुंड रवी माने याचा भरदिवसा निर्घृण खून करण्यात  आला होता. या खुनात दशरथ पवार याला अटक झाली होती.त्याने  वाल्मिकी आवासमध्ये  वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हल्लेखोर संशयित त्याच्यावर चिडून होते.  त्याचा संशयितांशी अनेकदा वादही झाला होता. त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकीही दिली होती. गेल्या तीन-चार दिवसात  हा वाद अधिकच विकोपाला गेला होता. 

बुधवारी पवार दसरा चौकात उभा होता. त्याचवेळी संशयित तिथून दुचाकीवरुन जात होते. पवार व संशयितांनी एकमेकांकडे खुन्नस देत पाहिले.  संशयितांकडे कोयता, चाकू व एडका अशी शस्त्रे  होती. सर्वांनी ‘आज दसर्‍याला सोडायचे नाही’, असे म्हणून हत्यारे घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला. जीव वाचविण्यासाठी पवार पळत सुटला. तेथील बाबू इनामदार यांच्या घरात घुसून त्याने दरवाजाची कडी आतून लाऊन घेतली. संशयितही त्या घरापर्यंत पाठलाग करीत पोहोचले. दरवाजावर त्यांनी खिडकीतील झाडांच्या कुंड्या फोडल्या. हत्यारांचे घाव घालून दरवाजाची मोडतोड केली. हा प्रकार पाहून बाबू इनामदार व त्याचा मुलगा मोसीन बाहेर आले. संशयितांनी त्यांच्यावर हल्ला केला. या गोंधळाचा फायदा घेत पवार पळून गेल्याने बचावला. 

घरावरील हल्ल्यात 30 हजारांचे नुकसान

संशयितांनी इनामदार यांच्या घरावर हल्ला केल्याने 30 हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी इनामदार यांच्या बहिणीचा मुलगा सूरज शेख याने फिर्याद दिली आहे. दरम्यान पवार याच्या खुनाचा प्रयत्न झाला मात्र त्याने फिर्याद दाखल केली नाही.  घटनेनंतर तो गायबही झाला आहे. त्याच्याविरुद्ध खून, जबरी चोरी व विनयभंग असे पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.