सांगली ः प्रतिनिधी
बिसूर (ता. मिरज) येथे दहा टक्के व्याजाने दिलेले पैसे परत करूनही अधिक पैशांसाठी एका वृद्ध दाम्पत्याला सांगलीतील सावकाराने बेदम मारहाण केली. गुरुवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी सावकाराविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इनुस नजीर पखाली (रा. गारपीर चौक, सांगली) असे सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजी आनंदराव पाटील (वय 70, रा. बिसूर) यांनी फिर्याद दिली आहे.
शिवाजी पाटील कुटुंबासमवेत बिसूर येथे रहातात. ते आणि त्यांचा मुलगा मंगेश शेती करतात. त्यांना काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा त्रास होत होता. त्यांनी सांगलीतील एका डॉक्टरांकडे औषधोपचार घेतले होते. औषधोपचारासाठी पैसे कमी पडल्याने त्यांनी बिसूरमधील ताजुद्दीन मुजावर याचा सांगलीतील भाचा इनुस पखाली याच्याकडून नोव्हेंबर 2017 मध्ये दहा टक्के प्रति महिना व्याजाने 70 हजार रूपये घेतले होते.
त्यापोटी त्यांनी आतापर्यंत प्रत्येक महिन्याला सात हजार रूपये आणि व्याज अशी रक्कम परत केली होती. पैसे देण्यास उशीर झाल्याने इनुसने त्यांच्याकडून प्रति दिवशी एक हजार रूपये दंडापोटी वसूल केले होते. गेल्या तेरा महिन्यात त्याने पाटील यांच्याकडून सुमारे एक लाख रूपये वसूल केले आहेत. एवढे पैसे दिल्यानंतरही त्याने अजून 70 हजार रूपये बाकी असल्याचे त्यांना सांगितले. त्या पैशांसाठी त्याने पाटील यांच्याकडे तगादा लावला होता.
गुरुवारी रात्री इनुस पाटील यांच्या घरी गेला होता. त्याने शिल्लक राहिलेली रक्कम आताच द्या, असा तगादा त्यांच्याकडे लावला. त्यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर त्याने पाटील दाम्पत्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेही जखमी झाले.