देवराष्ट्रे : विठ्ठल भोसले
शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या दुग्धव्यवसायाने जिल्ह्यात चांगलेच बस्तान बसवले आहे. जोडधंद्याचे रुपांतर व्यवसायात होऊन शेकडो बेरोजगार तरुणांनी या क्षेत्रात चांगलाच जम बसवलेला आहे. मात्र दुधाचे खरेदी दर कमी होत असल्याने त्याचा या व्यवसायाला फटका बसू लागला आहे. तर गोहत्या बंदीचा कायदा लागू झाल्याने भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. भाकड जनावरांच्या खर्चाचा अतिरिक्त बोजा शेतकर्यांवर पडत आहे.
जिल्ह्याच्या काही भागात अनेक वर्षांपासून शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. ताकारी उपसा सिंचन योजना, टेंभू योजना, म्हैसाळ योजना यांचे पाणी शिवारात आल्यामुळे दुग्ध व्यवसायासाठी गरजेचा असणारा हिरवा चारा उपलब्ध झाल्याने आणि दूध व्यवसायातून पैशांची चांगली आवक होत असल्याने जोडधंद्याची जागा मुख्य व्यवसायाने घेतली.अत्यंत कमी कालावधीत पैसे मिळत असल्याने शेकडो बेरोजगार तरुणांनी या धंद्यात उडी घेतली.जिल्ह्यात अनेक दूध संघांनी यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक पुरवठा केला.त्यामुळे परराज्यातून गायी, म्हशींची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. लहानशा गावातूनही हजारो लिटर दुधाची निर्मिती होऊ लागली.भरमसाठ दुधाची उपलब्धता पाहून जिल्ह्यात बाहेरील काही संस्थांनी आपले दूध संघ स्थापन केले.
दुधाची उपलब्धता, पावडर वर असलेली निर्यात बंदी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरीचे कमी झालेले दर यामुळे दूध संघांनी खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. यावर शासनाचे नियंत्रण नसल्याने अनेक संघांच्या खरेदी दरात तफावत आढळून येत आहे. नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान पहिल्यांदा खरेदी दरात कपात करण्यात आली. त्यानंतर अनेक वेळा बदल करण्यात आला.ऐन उन्हाळ्याच्या काळात दुधाचे उत्पन्न कमी होत असते. यावर्षी दूध पावडरचे उत्पादन कमी झाल्याने दूध शिल्लक राहत आहे. मात्र दूध उत्पादनाचा खर्च गगनाला भिडला आहे. तर राज्यात गोहत्या बंदीचा कायदा लागू झाल्याने कमी दूध देणार्या अथवा दूध न देणार्या भाकड जनावरांचा बोजा शेतकर्यांना सहन करावा लागतो आहे.
गायीच्या सरासरी 1 लिटर दूध निर्मितीचा विचार करता वैरण, पूरक आहार (पशुखाद्य), मिनरल मिक्स्चर, मजुरी आणि औषधे यांचा खर्च वजा जादा काहीच शिल्लक रहात नाही.जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी लाखो रुपये खर्चून गोठे बांधले आहेत.परराज्यातून दुधाळ गायी, म्हशी आणल्या आहेत. मात्र आता दुधाचे दर कमी झाल्याने त्यांच्या आशेवरच पाणी फिरले आहे. सातत्याने कमी होणार्या दूध दरामुळे शेकडो तरुणांचे भवितव्यच टांगणीला लागलेआहे.
देशी जनावरे नामशेष
कमी दूध दर, पोषक चार्याची कमतरता, गगनाला भिडलेले पशुखाद्याचे दर यामुळे कमी दूध देणारी आणि भाकड असणारी जनावरे शेतकर्यांना परवडत नाहीत. त्यामुळे संकरित जनावरे सांभाळण्याकडे शेतकर्यांचा अधिक कल आहे. मात्र अशा जनावरांच्या संख्येत प्रचंड घट होताना दिसत आहे.