Thu, Jul 02, 2020 11:39होमपेज › Sangli › नियती झाली जिल्ह्यावर रूष्ट

नियती झाली जिल्ह्यावर रूष्ट

Published On: Mar 11 2018 1:09AM | Last Updated: Mar 10 2018 11:27PMसांगली : उद्धव पाटील  

राज्याच्या राजकारणात सांगली जिल्ह्याचा नेहमीच मोठा दबदबा राहिला आहे. राज्य मंत्रीमंडळात जिल्ह्याला हक्काने वजनदार मंत्रीपदे मिळत गेली. त्या पदांना न्याय देण्याचे कामही इथल्या नेतृत्वाने केले. वसंतदादांच्यानंतर डॉ. पतंगराव कदम, आर. आर. आबा, जयंत पाटील, मदन पाटील या नेत्यांनी सांगलीचे नेतृत्व दमदारपणे केले. विदर्भ, मराठवाड्याच्या अनुशेषामुळे नेत्यांचे हात बांधले होते. तरिही हे नेते जिल्ह्याच्या विकासासाठी निधी खेचून आणत. मात्र गेल्या तीन वर्षात जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावरील तीन तारे निखळले. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. आबा, माजी मंत्री मदनभाऊ पाटील आणि आता माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या अकाली निधनामुळे जिल्हा पोरका झाला आहे. 

ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री (स्व.)वसंतदादा पाटील व नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर सांगली जिल्ह्यातील नेत्याने राज्यभर ठसा उमटविला तो माजी उपमुख्यमंत्री (स्व.) आर. आर. (आबा) पाटील यांनी. राज्यात 1995 मध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर काँग्रेसमधील नेतेमंडळींनी धसका घेतला होता. नेहमी सत्तेची सवय असलेल्या या मंडळींना विधीमंडळात प्रथमच विरोधात बसावे लागत होते. पुन्हा सत्तेेत कधी येणार अशी विवंचना तर होतीच! मात्र सत्ताधार्‍यांच्या उणीवांवर बोट ठेवून त्यांना ‘सळो की पळो’ करण्याचे आव्हान आर. आर. आबा यांनी मोठ्या हिंमतीने, हुशारीने लिलया पेलले. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली. आर. आर. आबा, डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील यांनी  मंत्रीमंडळात प्रभावी काम केले. 

जिल्ह्यातील नेत्यांची राजकीय कारकिर्द बहरत असतानाच आर. आर. आबांना कर्करोगाने गाठले. मुंबईत उपचार सुरू असताना दि. 16 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांचे निधन झाले. आर. आर. आबांचे निधन हा  सांगली जिल्हा आणि राज्यालाही  धक्कादायक ठरला. आबांच्या निधनातून जिल्हा सावरतो न सावरतो तोच  दि. 16 ऑक्टोबर 2015 रोजी माजीमंत्री मदन पाटील यांचे अकाली निधन झाले. जिल्ह्याला दहा महिन्यात हा दुसरा धक्का होता. वसंतदादा पाटील यांचे नातू असलेल्या मदन पाटील यांनी जिल्ह्यातील राजकारणात वेगळा ठसा उमटविला होता. त्यांचे समर्थक कार्यकर्ते जिल्हाभर होते. खासदार, आमदार आणि मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मंत्री असताना त्यांनी राज्यभरातील ‘दादा’ समर्थकांना पुन्हा सक्रिय करण्यास सुरूवात केली. मात्र मंत्रीपद अल्पकाळच टिकले.  राजकारणात त्यांचा दबदबा होता. 

आता तर डॉ. कदम गेले! डॉ. पतंगराव कदम यांच्या अकाली निधनाने सांगली जिल्ह्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्याला तीन वर्षात तीन धक्के बसले आहेत. डॉ. कदमसाहेब यांच्या निधनाने जिल्हा पोरका झाला आहे. डॉ. कदम यांची कारकिर्द अतिशय उत्तुंग अशी आहे.  अत्यंत गरिब कुटुंबातून त्यांनी ही भरारी घेतली. शिक्षण, सहकार, राजकारण, समाजकारण आदी क्षेत्रात त्यांच्या कर्तृत्वाने मोठी उंची गाठली. जिल्ह्याचा कृषी-औद्योगिक विकास साधण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले. ताकारी, म्हैसाळ, टेंभू सिंचन योजनांसाठी त्यांचे योगदान फार मोठे आणि महत्वाचे ठरले. डॉ.  कदम यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळीही  जाणवू लागणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी खेचून आणणारे, जिल्ह्याच्या विकासाला दिशा देणारे हे धडाकेबाज नेते अकाली निधनाने काळाच्या पडद्याआड गेले आहेत. जिल्ह्याला धक्क्यावर धक्के बसले आहेत.