Thu, Jul 02, 2020 11:46होमपेज › Sangli › मुख्यमंत्री आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी  जिंकले 

मुख्यमंत्री आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी  जिंकले 

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 18 2018 10:01PMयेळवी : विजय रुपनूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  शुक्रवारी सकाळी  जत तालुक्याच्या दौर्‍यावर आले होते.  तालुक्यातील पाणी फौडेशनतर्फे सुरू असलेली जलसंधारणाची कामे पाहण्याकरिता त्यांचा हा   दौरा होता. सकाळी 9.20वाजता  त्यांचे हेलिकॉप्टर  शेगाव- आवंढी  रस्त्यावरील हेलिपॅडवर उतरले. ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर ते  मोटारीने  आवंढी येथील  ओसाड माळरानावर पोहोचले. तिथे  पाणी फौडेशनतर्फे जलसंधारणाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी चालत जाऊन त्यांनी थेट श्रमदान सुरू केले. ग्रामस्थांसमवेत त्यांनी काम सुरू केल्याने तिथे श्रमदान करीत  असलेल्यांचा उत्साह वाढला.

मुख्यमंत्र्यांनी  श्रमदान करणार्‍या महिलाशी आपुलकीने व आस्थेने संवाद साधला. तिथे दगडी बांधाचे काम सुरू होते. मुख्यमंत्र्यांनी  स्वतः रचण्यास मदत केली. येथील समतल चर ,मातीनाला बांध ,दगडी बांध या कामांची माहिती घेतली. पाणी फौडेशन च्या कामाकरिता गावकर्‍यांना शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्री श्रमदानात स्वतः सहभागी झाल्याने तसेच त्यांनी ज्या आस्थेने श्रमदान करणार्‍या गावकर्‍यांशी संवाद साधला त्यामुळे सर्वजण भारावून गेले.एक ऊत्साहवर्धक वातावरण तिथे तयार झाले. मुख्यमंत्री या ठिकाणी येणार असे गुरुवारी ग्रामस्थांना समजले होते. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी लोक उत्सुक होते.

आवंढी  आणि बागलवाडी या दोन गावांत ते  दोन तास होते. मात्र तेवढ्या वेळेत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.त्याचबरोबर आवंढी व बागलवाडी येथील ग्रामस्थांनी सुरू केलेल्या श्रमदानाचे  कौतुक केले.भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा व पाणी फौडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी जलसंधारणाच्या कामात जे योगदान दिले आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचेही आभार मानले.मुख्यमंत्री फडणवीस  यांनी  यापूर्वी जत तालुक्यातील बिरनाळ येथे जलयुक्त शिवार योजनेमधून झालेल्या कामाची पाहणी केली होती. आज ही पाण्याच्या संबंधित असणार्‍या पाणी फौंडेशनच्या कामाची पाहणी करण्यासाठीच ते येथे आले.जलयुक्त शिवार या योजनेला चालना देण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनीच पुढाकार घेतला आहे. किंबहुना ती त्यांची सर्वात आवडती योजना आहे. त्यामुळे ते आज श्रमदान करणार्‍या ग्रामस्थांबरोबर अतिशय आस्थेने बोलत होते.दुष्काळ हटवण्यासाठी पाणी अडवा आणि पाणी जिरवा हा मंत्र किती उपयुक्त आहे, ते आवर्जून सांगत होते. मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांनी जलसाक्षरतेसाठी केलेल्या कामाचाही आवर्जून उल्लेख केला. या दौर्‍यांत कोणताही राजकीय विषय नव्हता. कोणतीही पोस्टरबाजी नव्हती. राजकीय व्यासपीठ नव्हते. हार -तुरे  आणि सत्कार नव्हता.अतिशय साध्या पध्दतीने हा  दौरा आयोजित करण्यात आला होता.