Tue, Jul 14, 2020 04:27होमपेज › Sangli › भाजपा सरकारने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली

भाजपा सरकारने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली

Published On: Mar 07 2019 2:03AM | Last Updated: Mar 07 2019 2:03AM
कडेगाव :  शहर प्रतिनिधी

गेल्या साडे चार वर्षात केवळ जाहिरातबाजी व घोषणाबाजी करून  भाजप सरकारने जनतेला फसवले आहे. देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या सरकारला सत्तेवरून घालवायचे आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

तालुक्यातील  वांगी येथील  विकास सोसायटीच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार डॉ. विश्‍वजीत कदम, सोनहिरा कारखान्याचे संचालक रघुनाथ कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोहिते, वांगीचे सरपंच डॉ. विजय होनमाने, उपसरपंच बाबासाहेब सूर्यवंशी, सोनहिर्‍याचे उपाध्यक्ष सयाजी धनवडे आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले,    दोन कोटी नोकर्‍यांचे आश्‍वासन देणार्‍या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सुमारे 1 कोटी 10 लाख रोजगार नष्ट झाले आहेत. शेतकर्‍यांना दुप्पट हमीभावाचे स्वप्न दाखवण्यार्‍या शासनाने महागाई आटोक्यात आणण्याच्या नावाखाली शेतीमालाला भाव मिळू दिला नाही.त्यामुळे ग्रामीण भागातील पैसा शहराकडे वळला व पर्यायाने अर्थकारण बिघडले आहे.  महागाई टोकाला गेली आहे. या सर्व गोष्टी वरचे सरकारचे नियंत्रण चुकल्यानेच नोटबंदी आली. नोटबंदी व जीएसटीने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.  ते म्हणाले, हे सगळे लक्षात आल्यावर शेतकर्‍यांना महिन्याला 500 रूपये देण्याचा निर्णय शासनाने निवडणुकीपुरता घेतला. कारण निवडणुकीनंतर आपण सत्तेवर येणार नाही, याची पूर्ण खात्री या शासनास झाली आहे. जर पुन्हा हे सरकार आले तर लोकशाहीचा गळा घोटून हुकूमशाही उदयास येईल.

 डॉ. विश्‍वजीत कदम म्हणाले, देशातील व राज्यातील वातावरण बदलत आहे. भाजप सरकार सहकाराच्या मुळावर उठले आहे. परंतु काँग्रेस हे सहकार क्षेत्राच्या खंबीर पणे पाठीशी आहे. सरपंच डॉ. विजय होनमाने, शेखर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सोसायटीच्या डॉ. पतंगराव कदम सभागृहाचे उद्घाटन झाले. उपसरपंच बाबासाहेब सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. लोकसभा न लढवण्याचे सूतोवाच आगामी लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह काँग्रेसचे वरिष्ठ नेते आम्हाला दिल्लीतूून करीत आहेत. परंतु मी आणि विश्‍वजीत कदम लोकसभा  निवडणूक लढवणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.