Fri, Sep 20, 2019 22:07होमपेज › Sangli › अखेर कृष्णा वाहू लागली घाटमाथ्यावरून

अखेर कृष्णा वाहू लागली घाटमाथ्यावरून

Published On: May 14 2019 2:04AM | Last Updated: May 13 2019 8:32PM
विटा : प्रतिनिधी

खानापूर घाटमाथ्यावर लोकांच्याबरोबर जनावरांनाही पाणी टंचाई जाणवू लागली असतानाच टेंभू योजनेचा 5 वा टप्पा कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे तहानलेल्या घाटमाथ्याला अग्रणी नदीत सोडलेल्या टेंभू योजनेच्या पाण्याने दिलासा मिळाला आहे.

खानापूर घाटमाथ्यावर विहिरी, बोअरचे पाणीसाठे संपुष्टात आले. विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या. परिणामी लोकांना व जनावरांना पिण्याच्या पाणी टंचाईला सामना करावा लागले.  हिवरे, मोही, पळशी, बेनापूर, ताडाचीवाडी, बाणूरगड, करंजे, रामनगर, घोटी खुर्द, कुर्ली  (घाडगेवाडी ), भांबर्डे व जखीनवाडी या तेरा गावांत लोकांना तर हिवरे, पळशी, ताडाचीवाडी, बाणूरगड, करंजे, रामनगर या सहा गावांत जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत.  

विहिरी व बोअरचे पाणी आटल्याने आटपाडी तालुक्यातील मानेवाडी व खानापूर तालुक्यातील गार्डी येथून टँकर भरून टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरविले जात आहे. दुष्काळी पट्टयातील काही गावांना टेंभूचे पाणी मिळत असल्याने तेथील पाणीटंचाई दूर झाली आहे. पाणी टंचाईबरोबर जनावरांच्या चार्‍यांचा प्रश्न भेडसावू लागला आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे लोक सांगोला, खानापूर व कडेगाव तालुक्यातील टेंभूच्या कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांकडून मका, उसाचे वाडे, शाळूची वैरण आणून जनावरे जगवत आहेत. सर्वसामान्य लोकांची मात्र जनावरे जगविण्यासाठी कसरत सुरू असताना टेंभू योजनेचा 5 वा टप्पा नुकताच कार्यान्वित झाला. अग्रणी नदीत पाणी सोडण्यात आले आणि घटमाथ्याला वरील अनेक गावांना दिलासा मिळाला खानापूर तालुक्यातील घाटमाथ्यावर असणारी अग्रणी नदी वाहती झाली आहे. कायम दुष्काळी असणार्‍या खानापूर तालुक्यातील घाटमाथ्यावर आता कृष्णा नदीचे पाणी पोहचले आहे. यामुळे तालुक्यातील येरळा आणि अग्रणी नद्या वाहत्या होऊन दुष्काळी कलंक कायमचा पुसला जाणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघतानाच शेती बहरून येणार आहे.

टेंभू योजनेच्या पाचव्या टप्याच्या माध्यमातून खानापूर घाटमाथ्यावर कृष्णा नदीचे पाणी अग्रणी नदीत सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे अग्रणी नदीवर बांधण्यात आलेल्या बंधार्‍यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होणार आहे. त्यामुळे घाटमाथ्यावरील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल. ऐन दुष्काळात घाटमाथ्यावर टेंभू योजनेचे पाणी आल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. 
या पाण्यासाठी लोकांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागली होती. घाटमाथ्यावरील बलवडी, बेनापूर, सुलतानगादे, करंजे, रामनगर आणि पुढे तासगाव तालुक्यातील वायफळे आदी गावांना दुष्काळात दिलासा मिळणार आहे. पाचव्या टप्प्यातील गोरेवाडी कालव्यातून उर्वरित गावांना पाणी मिळणार आहे. 

12  गावे आणि  2  वाड्यावस्त्यांवर दुष्काळी परिस्थिती आहे, दुष्काळामुळे 19 हजार 613 लोकसंख्या होरपळत आहे. यासाठी शासनाने 14 टँकर्स  (शासकीय - 2, खासगी - 12) तैनात केले आहेत. याद्वारे 45 मंजूर खेपापैकी 43 खेपा प्रत्यक्ष पुरवल्या जात आहेत.  दरम्यान, जनावरांसाठीही 6  गावांच्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. जनावरांच्यासाठी दररोज पाण्याच्या 9 खेपा दिल्या जात आहेत.