Sun, Jul 05, 2020 15:23होमपेज › Sangli › ठाकूरबुवा माऊलींचा गोल रिंगण सोहळा लाखो नयनांनी आनंदला

ठाकूरबुवा माऊलींचा गोल रिंगण सोहळा लाखो नयनांनी आनंदला

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 20 2018 9:51PMवेळापूर : धनंजय पवार 

वेळापूर येथील  माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या मुक्कामानंतर सकाळी साडेपाचच्या मानाच्या आरतीनंतर माऊलींचा हा पालखी सोहळा 20 जुलै रोजी ठाकूरबुवा येथील गोल रिंगण सोहळ्यासाठी पंढरीच्या दिशेने  मार्गस्थ झाला. यावेळी ऊन-सावलीचा खेळ, ढगाळ वातावरणात सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची वैष्णवांना लागलेली आतुरता, टाळ-मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा निघाला.

यात सर्वात पुढे पताकाधारी नंतर टाळकरी, विणेकरी, डोक्यावरती तुळशी घेतलेल्या महिला वारकरी अशा सर्व दिंड्या पावसाची थोडी रिपरिप, थोडेसे ऊन, थोडीशी सावली, विठ्ठलाच्या दर्शनाची लागलेली ओढ, चालता चालता ‘माऊली माऊली’चे मुखातून नामस्मरण करीत आनंदात वारकरी शिस्तबद्धपणे चालत होते. हा सोहळा ठाकूरबुवा येथे सकाळी  9 वा. 15 मि. ठाकूरबुवा समाधीस्थळी पोहोचल्यानंतर या सोहळ्याचे स्वागत सरपंच चाँद मुलाणी व  नागरिकांनी केले. 

यानंतर पालखीने रथासह एक फेरी रिंगण सोहळ्याच्या जागेस पूर्ण केल्यानंतर पालखी बरोबर रिंगण सोहळा जागेच्या मधोमध ठेवण्यात आली. यावेळी हात उंचावून सर्वांनी दर्शनाचा लाभ घेतला, तर रथ ठाकूरबुवा यांच्या समाधीजवळ नेण्यात आला. यानंतर बरोबर 9 वाजून  30 मिनिटांनी रिंगण लावण्यात आले. यात आधी माऊलींचा अश्‍व व स्वाराचा अश्‍व दाखल झाल्यानंतर हे रिंगण राजाभाऊ चोपदार, बाळासाो चोपदार, उध्दव चोपदार यांनी लावले. यात प्रथम रथाच्या पुढील मानाच्या दिंडीतील पताकाधारी मानकरी यांनी गोल कडे केले होते. यावेळी चोपदारांनी अश्‍वाला रिंगण दाखविले, तर लगेचच माऊलींचा अश्‍व दाखल झाल्यानंतर सकाळपासून  दर्शनासाठी आसुसलेल्या भक्तांनी यावेळी ‘माऊली माऊली’चा टाळ्यांचा गजर केला.