Sat, Aug 24, 2019 10:16होमपेज › Sangli › दहा हजार टन दूधपावडर पडून

दहा हजार टन दूधपावडर पडून

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 21 2018 7:54PMसांगली : विवेक दाभोळे

गेल्या काही महिन्यांपासून दूधपावडरीचे दर कोसळल्याने पावडरीचा मोठा साठा राज्यभरात शिल्लक आहे. उपलब्ध माहितीनुसार एकट्या सांगली जिल्ह्यात जवळपास 10 हजार मे. टनाच्या आसपास दूधपावडरीचा साठा विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. केवळ सांगली जिल्ह्यातच नव्हेतर संपूर्ण राज्यभरातल दूधव्यवसायाला दूधपावडरीच्या शिल्लक साठ्याचे ‘ग्रहण’ लागले आहे. सध्याच्या दरात बाजारातील विक्रीतून उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याने दूधपावडरीचा व्यवसाय हा अभूतपूर्व कोंडीत सापडला आहे.  दूधपावडरीचा साठा जलद गतीने कमी व्हावा, यासाठी तातडीने भरीव निर्यात अनुदानाची घोषणा करण्याची गरज दुग्धव्यवसायातील जाणकारांतून व्यक्त होत आहे.

सहा- सात महिन्यांपूर्वी शासनाने दूध खरेदी दरात वाढ केल्यानंतर दुग्धव्यवसाय हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा वाढीव दर देण्यास अनेक सहकारी दूध संघांनी देखील नकार दिला, त्यांच्यावर शासनाने केवळ कारवाईचे इशारे दिले, प्रत्यक्षात कारवाई काहीच झाली नाही. आता तर उघडउघड अनेक दूध संघांनी खुलेआम खरेदी दर कमी करण्याचे धाडस करुन सरकारच्या दरवाढीला झुगारून लावले आहे. एकीकडे दर वाढ, कपातीचा हा शहकाटशहाचा खेळ रंगत असतानाच दूधपावडरीच्या प्रचंड मोठ्या साठ्याने दुग्धव्यवसायाची चांगलीच कोंडी झाली आहे.

ऐन उन्हाळ्यात सर्वच संबंधित घटकांना अनाकलनीयरीत्या दुधाचे वाढलेले उत्पादन जणू  उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरले. या वाढीव उत्पादनाने संकलन करणार्‍या दूध संघचालकांची मात्र चांगलीच पळापळ झाली. यातूनच जादा दुधाची पावडर करण्याचा पर्याय अनेकांनी हाताळला, मात्र याचवेळी सर्वत्रच अशी स्थिती निर्माण झाल्याने पावडरीचे दर वेगाने घसरले. साधारणपणे 190 रु. किलोच्या घरात असणारा पावडरीचा दर आता अवघ्या सव्वाशे  रुपयांच्या घरात आला. यातून या धंद्याला फार मोठा फटका बसला. 

साधारणपणे एक किलो दूध पावडर निर्मितीसाठी  170 ते 190 रुपयांच्या घरात खर्च येतो. मात्र बाजारात अपेक्षित नफा गृहित धरुन योग्य दर मिळत नसल्याने दूधपावडर  विकणे आतबट्ट्याचे ठरू लागले आहे. एकीकडे  वाढत चाललेल्या दूधपावडर साठ्याने दूधपावडर उत्पादकांची कोंडी झाली आहे. तर सरकार मात्र निर्यात अनुदानाची घोषणा लगेच करत नसल्याचे चित्र आहे. सध्या देशात 2 लाख टन इतका दूध पावडर साठा शिल्लक आहे. तर राज्यात 43 हजार मे. टन दूध पावडर शिल्लक आहे.  केंद्र शासनाने 20 टक्के निर्यात अनुदान तातडीने द्यावे तसेच  गाईच्या दुधाला प्रतिलिटर 6 रुपयांचे अनुदान शासनाने थेट दूध उत्पादकांच्या  खात्यावर जमा करण्याची मागणी होत आहे.

दरवाढ देण्यास नकार; कारवाईचे केवळ इशारेच

आता दुधाच्या दरात शासनाने वाढ केली आहे. यानुसार  दूध पावडरचा दर 165 रु. प्रतिकिलो  असण्याची गरज आहे. पण हा दर  120 ते 130 रुपयांपर्यंत गडगडला आहे. विशेष म्हणजे दर कमी असूनही पावडरला मागणी नाही. साहजिकच यामुळे राज्यातील अनेक संघ, डेअरीमालक, पावडर प्लँटधारक गाय दूध स्वीकारण्यास नकार देत आहेत. याच चक्रव्युहात दुग्ध व्यवसाय लटकला आहे. आता  तर दूध दर आणखी कमी झाले आहेत. भविष्यात दर घसरण्याचीच भीती आहे. राज्य शासनाने 3.5 फॅट व 8.50  एस. एन. एफ. हा निकष बदलून तो आता कमी करत 3.2 फॅट व  8.3 एस. एन. एफ. असा केला आहे. मात्र याचा फटका दूध व्यवसायाला चांगलाच बसणार असल्याची टीका होत आहे.