Mon, Jul 13, 2020 06:10होमपेज › Sangli › आचारसंहितेत शिक्षक आंतरजिल्हा बदल्यांचा धडाका

आचारसंहितेत शिक्षक आंतरजिल्हा बदल्यांचा धडाका

Published On: May 11 2019 2:05AM | Last Updated: May 10 2019 11:50PM
नाशिक : प्रतिनिधी

आचारसंहितेचा फेरा कायम असताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शुक्रवारी रात्री शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा खेळ रंगला. विशेष म्हणजे, बदल्यांची कुणकुण थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचल्यानंतर जिल्हा परिषदेला कडक शब्दांत फटकारल्यानंतर शिक्षकांना दिलेले आदेश रात्री उशीरा परत घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

लोकसभेच्या नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघांसाठी मतदानाचा टप्पा पार पडला असला तरी मतमोजणी 23 मेस होणार असून, तोपर्यंत आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेची कोणतीही भीती न बाळगता प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा बार उडवून दिला. एकूण 69 बदल्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार दोन दिवस आणि रात्रभर बसून संपूर्ण माहिती जमा करण्यात आली. शुक्रवारी या शिक्षकांना समुपदेशनासाठी कै. रावसाहेब थोरात सभागृहात बोलाविण्यात आले होते. त्यानंतर काही शिक्षकांच्या हाती बदल्यांचे आदेश सोपविण्यातही आले. बदल्यांची कार्यवाही सुरू असल्याची बाब जिल्हाधिकार्‍यांपर्यंत जाऊन पोहचली. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेला कडक शब्दांत फटकारत बदल्या रद्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आदेश तर दिले पण, पुढे काय करायचे, यासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागात रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. अधिकारी कार्यालयात ठाण मांडून होते. तर शिक्षकांचीही गर्दी होती. एकीकडे विविध प्रकारच्या योजना मार्गी लावण्यासाठी आचारसंहितेचे कारण सांगून वेळकाढूपणा केला जात आहे. दुसरीकडे आचारसंहितेतही बदल्या करण्याचे धाडस दाखविण्यात आल्याने ‘अर्थ’पूर्ण चर्चा रंगली आहे. 

खरे तर, आचारसंहिता लागू असली तरी आंतरजिल्हा बदल्या करण्याची तयारी आधीपासूनच करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आचारसंहितेच्या काळातच बदलीपात्र शिक्षकांची यादी आणि  प्रस्तावही तयार ठेवण्यात आले होते. केवळ आचारसंहिता शिथिल होण्याची वाट पाहण्यात आली. मतदानाचा टप्पा पार पडताच समुपदेशनाने बदल्या करण्याचे धाडस दाखविण्यात आल्याने यात नेमके कोणाचे आणि काय हित दडले आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.