Wed, Jul 08, 2020 04:18होमपेज › Sangli › सांगलीतील एकाच्या अपहरणप्रकरणी कारवाई

तासगावच्या व्यापार्‍यासह दोघांना अटक

Published On: Oct 30 2018 2:18PM | Last Updated: Oct 30 2018 2:18PMसांगली : प्रतिनिधी

आमच्याच कंपनीत बिल वसूलीचे काम करावे लागेल असे म्हणून सांगलीतील एकाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याप्रकरणी तासगावमधील एका व्यापार्‍यासह दोघांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पाचजणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अनिल रतनलाल धामेजा (वय ४२), दीपक स्वामीनाथ सिंग (वय २४, दोघेही रा. माळी गल्ली, तासगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अन्य तीन अनोळखीं व्‍यक्‍ती विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विजय भागचंद आहुजा (वय ५४, रा. वृषाली अपार्टमेंट, बसस्थानकाजवळ, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. आहुजा अनिल धामेजा यांच्या वडिलांच्या कंपनीत बिल वसुलीचे काम करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या कंपनीचे विभाजन झाले. त्यानंतर अनिल धामेजा यांच्याकडे पूजा फुटवेअर कंपनी चालवण्यास देण्यात आली होती. मात्र आहुजा यांना अनिल यांच्या कंपनीत काम करायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी १४ऑक्टोबरला नोकरीचा राजीनामा दिला होता. 

त्यानंतर अनिल धामेजा वारंवार त्यांना फोन करून त्यांच्या कंपनीत काम करण्यास सांगत होते. त्यानंतर रविवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास अनिल धामेजा, दीपक सिंग यांच्यासह तीन अनोळखी आहुजा यांच्या सांगलीतील घरी आले. तेथे तिघा अनोळखींनी शेठनी बोलवले आहे असे म्हणून घरातून बाहेर आणले. तेथे धामेजा इनोव्हा (एमएच १० बीएम ३२४०) मध्ये बसले होते. त्यांनी आहुजा यांना मिरजेत बिल आणण्यासाठी जायचे आहे असे सांगून जबरदस्तीने गाडीत बसवले. 

त्यानंतर त्यांना मिरज, तासगाव फाट्याहून कुमठे व तेथून कानडवाडीतील स्वयंभू गणेश मंदिराजवळ नेले. तेथे गेल्यावर धामेजा यांनी माझ्याकडेच काम करायचे अशी धमकी त्यांना दिली. नंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. त्यांना तेथेच जखमी अवस्थेत सोडून सर्व संशयित तेथून गाडीतून निघून गेले. 

त्यानंतर  आहुजा कसेबसे सांगलीत पोहोचले. त्यानंतर त्यांनी कुटुंबियांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. आहुजा यांनी सोमवारी रात्री याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल धामेजा, दीपक सिंग यांना अटक करण्यात आली आहे. अन्य तीन संशयित पसार झाले आहेत. पोलिस निरीक्षक मिलींद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश शिंदे अधिक तपास करत आहेत. 

अपहरणासाठी पैलवानांचा वापर...

दरम्यान आहुजा यांनी दिलेल्या फिर्यादीत अनिल धामेजा यांच्यासमवेत आलेले अनोळखी लोक पैलवान होते. त्यानीच बेदम मारहाण केली असून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिस त्या पैलवानांचा शोध घेत आहेत.