Tue, Jul 14, 2020 08:17होमपेज › Sangli › कातडी कमविण्याचा उद्योग संपुष्टात

कातडी कमविण्याचा उद्योग संपुष्टात

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 7:56PMकडेगाव : रजाअली पिरजादे 

कडेगावातील प्रसिद्ध कातडी कमवण्याचा व्यवसाय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दरम्यान,  हा व्यवसाय पूर्णपणे बंद पडल्याने तालुक्यातील 50 कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील कातडी कमवण्याचा व्यवसाय काही लोक पारंपरिकरीतीने गेल्या अनेक वर्षांपासून करीत होते. या व्यवसायावर कडेगावातील 10 कुटुंबांसह तालुक्यातील सुमारे 40 कुटुंबांचा उदरनिर्वाह होता. परंतु हा व्यवसाय आजच्या आधुनिक काळात बंद पडला आहे. त्याला अनेक कारणे आहेत.  प्रामुख्याने पूर्वीप्रमाणे कच्चा माल मिळत नाही. आज सुशिक्षित तरुण पिढी पारंपरिक व्यवसायाकडे वळत नाही.  शासन प्रोत्साहन देत नाही, तयार होणार्‍या मालाला मागणी नाही, शिवाय बाजारात विविध नामवंत कंपन्यांचे तयार कातडी बूट व चप्पल  कमी पैशात मिळू लागल्या आहेत. याचा  फटका या सार्‍या उद्योगाला बसला आहे. 

तालुक्यात पूर्वी कातडी कमवण्याचा व्यवसाय सर्व गावांत होत होता. गावागावांत कातडी चप्पल, बूट तयार करणारी मंडळी होती. तसेच त्या काळात  शेतकरी सर्रास गावातच तयार झालेली  पादत्राणे वापरत होते. कडेगावात कातडी कमावण्यापासून बूट, चप्पल तयार करणे हा व्यवसाय एकेकाळी मोठ्या प्रमाणात चालत होता.कडेगाव पूर्वी या व्यवसायाचे प्रमुख केंद्र मानले जात होते. कडेगाव प्रमाणे कडेपूर, सोहोली, चिखली, चिंचणी, वांगी, मोहिते  वडगाव, तडसर आदी गावांत हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असे. या व्यवसायावर  तालुक्यातील  50 कुटुंबे आपला उदरनिर्वाह करीत होती. परंतु आता काळ बदलला आहे, त्यानुसार व्यवसाय आणि व्यवसाय करणारे लोकही बदलले आहेत. अगदी सुरुवातीच्या काळात काही कंपन्यांनी बाजारात  चप्पल, बूट सर्वप्रथम आणले तेव्हापासून या व्यवसायाला गळती लागली.  विविध कंपन्यांचे  चप्पल, बूट आणि कातडी वस्तू आता मिळू  लागल्याने गावातील  जुन्या  पद्धतीच्या कातडी वस्तूंची निर्मिती बंद   झाली आहे.