होमपेज › Sangli › जिल्ह्याच्या विकासासाठी स्वाभिमानीला साथ द्या

जिल्ह्याच्या विकासासाठी स्वाभिमानीला साथ द्या

Published On: Apr 04 2019 2:02AM | Last Updated: Apr 03 2019 10:49PM




सांगली : प्रतिनिधी 

जिल्ह्याच्या विकासासाठी महाआघाडी-स्वाभिमानी पक्षाला साथ द्या, असे आवाहन स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील  यांनी केले. त्यांनी बुधवारी मतदारसंघात गाठी-भेटीवर भर दिला. तसेच प्रचाराचे  नियोजन केले. गुरूवारपासून ते  प्रचारासाठी जिल्हा दौर्‍यावर  जाणार आहेत.

पाटील यांच्या प्रचाराचा शुभांरभ मंगळवारी   जोरदार झाला. त्या सभेला  खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते आमदार डॉ. विश्‍वजित कदम, विट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, जयश्री पाटील, आमदार सुमन पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील  उपस्थित होते. या सभेत  आघाडीच्या सर्वच नेत्यांनी एकदिलाने काम करून विशाल यांच्या पाठीशी  राहण्याचा निर्धार जाहीर  केला. 

पलूस-कडेगाव रेल्वे   गेटजवळ क्रॉसिंगमुळे बस थांबली होती. ती थांबल्यावर विशाल पाटील यांनी बसमध्ये जाऊन लोकांशी संपर्क साधला. तसेच सांगलीत  बार असोशिएशनमध्ये जाऊन वकिलांशी संवाद साधला. प्रचारासाठी काँग्रेस कमिटीजवळ कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयात काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची बैठक झाली. प्रचाराच्या दौर्‍यांचे नियोजन केले.  

विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा मतदारसंघनिहाय  जबाबदारी वाटून दिली. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील दुसर्‍या फळीतील नेत्यांच्या गाठी-भेटी घेतल्या. रात्री उशिरा मिरजेत कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांची बैठक झाली. गुरूवारी (दि.4)  पाटील  मिरज तालुक्यातील टाकळी, बोलवाड, मल्लेवाडी, एंरडोली, शिपूर, संतोषवाडी, जानराववाडी, चाबूकस्वारवाडी, सलगरे, बेळंकी, कदमवाडी, डोंगरवाडी येथे  प्रचार करणार आहेत.