Tue, Jul 14, 2020 05:01होमपेज › Sangli › वारणाकाठी प्रयोगशील शेतकर्‍याचा उपक्रम

पाणथळीत उसाचे उत्पादन

Published On: Jun 10 2018 1:50AM | Last Updated: Jun 09 2018 8:17PMमातीतलं सोनं - विवेक दाभोळे
 

उसाचे एकरी उत्पादन घटत असतानाच्या काळात वारणाकाठच्या सावळवाडी येथे सुधीर हेमकांत आवटी या शेतकर्‍याने  आपल्या पाणथळ स्वरुपाच्या जमिनीत उसाचे पीक घेताना एकरी उच्चांकी उत्पादन घेण्यात सातत्य कायम राखले आहे. आसपासच्या शेतकर्‍यांना एकरी 20 ते 25 टनाचे जेमतमे उत्पन्न मिळत असताना आवटी यांनी मात्र एकरी 50 टनाच्या घरात उत्पादन घेण्यात सातत्य कायम राखले आहे. 

लागण आणि नंतर खोडव्याची पिके घेऊन खर्चात बचत, आंतरमशागतीला फाटा, हिरवळीच्या खतांसाठी विविध धान्य-कडधान्य पिकांचा वापर आणि ठिबकमधून जैविक खतांची मात्रा या चतु:सुत्रीचा वापर करत आवटी यांनी ऊस शेतीत आपला असा एक पॅटर्न निर्माण केला आहे. वारणाकाठी दुधगावपासून काही अंतरावर सावळवाडी आहे. वाडीपासून नदीपासून दीड दोन कि. मी. अंतरावर आवटी यांची शेतजमीन आहे. या बहुतेक सार्‍या जमिनीत पावसाळ्यात तीन- चार महिने पाणीच साचून  राहिलेले असते. यामुळे या जमिनीत पिके घेणे तसे कमालीचे अवघडच! मात्र आवटी यांनी मोठ्या जिद्दीने या पाणथळ जमिनीत उसाचा  मळा फुलविला आहे. 

लावण करण्यासाठी त्यांनी को-86032 या वाणाची निवड केली. ऊस लावणीनंतर त्यांनी बिभीषण पाटील तसेच पोखर्णीचे सतशी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय खतांचे या पिकांसाठी व्यवस्थापन केले. मात्र त्याआधी लावण करताना त्यांनी एकआड एक सरीत लावण केली. रिकाम्या सरीत त्यांनी कोरटा, मूग, तूर, उडीद आदींचे पीक घेतले. उसाच्या वाढीबरोबरच या मिश्रपिकांची देखील चांगली वाढ होत होती. ही धान्यपिके फुलोर्‍यात आल्यानंतर ही पिके त्यांनी सरीतच मुजविली.

हिरवळीच्या खतांसाठी या पिकांचा अतिशय चांगला वापर झाल्याचा त्यांचा अनुभव आहे. ठिबकचे पाणी असल्याकारणाने त्यांना पाण्याचे व्यवस्थापन आणि त्यातून जैविक खतांची मात्रा देणे सहज शक्य आणि परिणामकारक होत होते. जोडीला योग्यवेळी सेंद्रिय खतांचा वापर केल्याने उसाचे पीक देखील चांगले वाढत असल्याचा त्यांना अनुभव आला. लावण पिकासाठी मशागत, खते आदी मिळून एकरी साधारणपणे 32 ते 35 हजार रुपयापर्यंत खर्च आला. मात्र यात त्यांना एकरी 40 मे. टनाचे उत्पादन मिळाले. नदीकाठच्या शेतीत एकरी चाळीस टनाच्या घरात उत्पादन मिळविण्यासाठी मोठाच खर्च करावा लागत असताना पाणथळ जमिनीत आवटी यांना एकरी 40 मे. टन उसाचे मिळालेले उत्पादन हे लक्षवेधी ठरले.

अर्थात याचवेळी आसपासच्या शेतकर्‍यांना मात्र अवघे 20 ते 25 टन उत्पादन मिळत होते. आवटी हे केवळ लावण काढून थांबले नाहीत, तर त्यांनी नंतर खोडवा घेतले. पहिल्या खोडव्यात देखील त्यांना 40 मे. टन उत्पादन मिळाले, मात्र यावेळी खोडवा असल्यामुळे खर्च देखील कमी झाला होता. हा दुप्पट फायदा ठरला. नंतर दुसरा खोडवा घेतला. याचे देखील त्यांना पहिल्या खोडव्याप्रमाणेच उसाचे उत्पादन मिळाले. आता त्यांचा तिसरा खोडवा तयार आहे. येत्या हंगामात  त्याचे देखील चांगले उत्पादन मिळेल, असा त्यांचा रास्त विश्‍वास आहे.

मात्र यासाठी त्यांनी थोडासा बदल म्हणून पाटील यांच्या सल्ल्यानुसार कंपोस्ट कल्चरचा वापर करण्यास सुरुवात केली. उसाचे लावण आणि एक खोडवा पीक घेतले की शेतकरी शक्यतो एक वर्षांचे अंतर ठेवून नंतर  नवीन लागण करतात. मात्र आपल्या पाणथळ जमिनीतदेखील लावणीसह सलग तिसरे खोडवा पीक घेऊन, तुलनेने उच्चांकी उत्पादन घेत आवटी यांनी अन्य शेतकर्‍यांसमोर एक नाविण्यापूर्ण उदाहरणच ठेवले आहे, असे म्हटले तर ते फारसे चुकीचे ठरणार नाही.