Sat, Jul 11, 2020 14:36होमपेज › Sangli › राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकार्‍यावर गुन्हा

राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकार्‍यावर गुन्हा

Published On: Oct 05 2018 1:09AM | Last Updated: Oct 05 2018 1:09AMसांगली : प्रतिनिधी

येथील  गुंड सनी दरिकांत कांबळे याच्या खूनप्रकरणी  राष्ट्रवादीचा सांगली विधानसभा क्षेत्राचा माजी अध्यक्ष जमीर  रंगरेज (रा. अहिल्यानगर) याच्या विरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी पाच जणांना अटक  केली आहे.  एका अल्पवयीन तरुणास ताब्यात घेतले आहे. इमाम ऊर्फ जिच्या मेहबूब शेख (वय 21), संदीप एकनाथ भोसले (वय 23,  रा. दोघे  अहिल्यानगर) अक्षय महादेव मोहिते (वय 19,  रा. शालिनीनगर) धनाजी मारुती बुवनूर (वय 31 ) आणि रफिक अब्दुल शेख(वय 26, रा. दोघे अहिल्यानगर) यांचा त्यात समावेश आहे. 

खुनाचा बदला, सततच्या त्रासामुळे कृत्य इमामची पानपट्टी असून रफीक प्लॉट एजंट आहे. इतर तिघे मजुरीची कामे करतात.  पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी मित्र रवी माने याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी खून केला. त्याशिवाय सनी हा अल्पवयीन तरुणास मारहाण करून सतत पैशाची मागणी करीत होता. त्यामुळे त्याचा कायमचा काटा काढला, अशी कबुली संशयितांनी दिली आहे असे पोलिसांनी सांगितले.

माधवनगर रस्त्यावरील दुर्गामाता मंदिराच्या पिछाडीस बुधवारी सकाळी सनी कांबळे याचा  पाठलाग करून खून करण्यात आला होता.  या खून प्रकरणात  रंगरेज हा मुख्य सूत्रधार आहे, असा आरोप   सनीच्या नातेवाईकांनी केला  आहे. त्याला अटक करावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यानुसार गुरुवारी रात्री त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.पोलिस  निरीक्षक मिलिंद पाटील यांनी सांगितले  की, प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणि आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेल्यांना अटक केली आहे. एका अल्पवयीन तरुणासही ताब्यत घेतले आहे. या सर्वांच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स काढण्यात येत आहेत.  
सनीच्या नातेवाईकांच्या तक्रारीनुसार रंगरेज विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.  यामध्ये आणखी कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. कोणालाही सोडले जाणार नाही. 

दरम्यान खुनाची माहिती मिळाल्यानंतर गुंडा विरोधी पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची पथके ठिक-ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. त्यातील गुंडा विरोधी  पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष डोके, महेश आवळे, शंकर पाटील यांनी सहा संशयितांना कवठेमहांकाळ येथे पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता  अल्पवयीन तरुणास सनी हा सतत मारहाण करून त्रास देत होता. त्याशिवाय शिवीगाळ करून धमकावत होता. त्यामुळे सनीला कायमचे संपवायचे असा त्यांनी निश्चिय  केला होता. त्यानुसार बुधवारी सकाळी त्याचा खून करण्यात आला अशी माहिती अटक केलेल्या संशयितांनी पोलिसांना दिली आहे.