सांगली : प्रतिनिधी
तुंग (ता. मिरज) येथे एका महिलेने घरातील तुळईला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपाली किशोर आवटे (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दीपाली तुंग येथे पतीसमवेत भाड्याच्या घरात राहत होत्या. त्यांचा गावातच नाष्ट्याचा हातगाडा आहे. गुरुवारी दुपारी त्यांचे पती साहित्य खरेदीसाठी सांगलीत गेले होते. घरात कोणीही नसल्याचे पाहून दीपाली यांनी तुळईला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. सायंकाळी चारच्या सुमारास पती परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. रात्री उशीरा सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.