होमपेज › Sangli › साखर दर वाढले, आता थकीत ऊस बिले द्या : राजू शेट्टी 

साखर दर वाढले, आता थकीत ऊस बिले द्या : राजू शेट्टी 

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 23 2018 9:52PMवाळवा ः प्रतिनिधी

साखर दर वाढले आहेत, त्यामुळे आता उसाचे थकीत बिल देण्यास कारखानदारांना काहीच अडचण नाही. शेतकर्‍यांचे पैसे बुडविण्याचा कारखानदारांनी प्रयत्न केला तर त्यांना स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचा हिसका दाखविला जाईल,  असा इशारा खा.राजू शेट्टी यांनी दिला. वाळवा येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. 

ते म्हणाले, 30 जूनच्या आत शेतकर्‍यांना 1966 च्या कायद्यानुसार उसाचे बिल मिळाले पाहिजे. अन्यथा गाठ स्वाभिमानीशी आहे. त्यासाठी सरकारने कारखान्यांच्या मालमत्ता जप्त करा, साखर जप्त करा, पण आमचे पैसे द्या. आतापर्यंत साखरेचे दर घसरले होते. त्यामुळे आम्ही गप्प होतो. आमच्या सहनशिलतेचा अंत बघू नका. 2 हजार 900  ते 3 हजार पर्यंत साखरेचे दर वाढले आहेत. मग  शेतकर्‍यांची देणी का  थांबवता. 

उत्तरप्रदेशमध्ये  ऊस पट्ट्यात झालेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यामुळेच साखरेच्या किंमती वाढल्या. केवळ जातीय व धार्मिक तेढ वाढवून मतांचे राजकारण करणार्‍यांना भाजपला पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत.  फोफावलेले कमळ तळापासून मतांच्या जोरावर नामशेष करण्याची ताकद शेतकर्‍यांत आहे.  

तसेच भाजपच्या कळपात जावून जे  कारखानदार पैसे बुडवायच्या नादात आहेत. त्यांनाही शेतकरी पाठिशी घालणार नाहीत. त्यांच्यासाठी उसाचा बुडका हातात घ्यावा लागेल, असा इशारा दिला. ते पुढे म्हणाले, 2011 मध्ये   पुणे येथे मोर्चा झाला, त्यापेक्षाही मोठा मोर्चा 29 जून रोजी निघेल.  हा मोर्चा सरकारच्या शेंडीत जाळ करणारा ठरेल असे सांगून गावोगाव कार्यकर्त्यांनी मोर्चासाठी जनजागृती करावी.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सयाजी मोरे, अ‍ॅड. शमशुद्दीन संदे, महेश खराडे, भागवत जाधव, महावीर पाटील, किसन गावडे, जयकुमार कोले, भरत नवले, अजित नवले आदी उपस्थित होते.