Wed, Jul 08, 2020 15:32होमपेज › Sangli › इस्लामपुरातून विद्यार्थ्याचे अपहरण

इस्लामपुरातून विद्यार्थ्याचे अपहरण

Published On: Jun 05 2019 1:31AM | Last Updated: Jun 05 2019 1:31AM
इस्लामपूर : वार्ताहर

येथील वरदराज बाळासाहेब खामकर (वय 10) हा शाळकरी मुलगा  सोमवारी सायंकाळी ताकारी रोडवरील एका क्‍लासजवळून बेपत्ता झाला आहे. त्याचे अज्ञातांनी अपहरण केल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिली. त्याचे कारमधून आलेल्या काहींनी अपहरण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिस त्याचा शोध घेत असून दुसर्‍या दिवशीही त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नव्हता. 

वरदराज येथील मालती कन्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल बाळासाहेब धोंडिराम खामकर (रा. अक्षर कॉलनी) यांचा मुलगा आहे. तो 5 वीमध्ये  शिकत आहे. ताकारी रोडवरील महावितरणच्या कार्यालयासमोरील मोहन पाटील यांच्याकडे तो नवोदयच्या क्‍लाससाठी जातो. त्याला क्‍लासला सोडण्यासाठी व आणण्यासाठी त्याचे आई किंवा वडील जातात. 

सोमवारी सकाळी 10 वाजता त्याच्या आईने त्याला क्‍लाससाठी सोडले होते. सायंकाळी 5 वाजता बाळासाहेब खामकर हे त्याला आणण्यासाठी मोटारसायकलवरून गेले. त्यावेळी क्‍लासमधील सर्व मुलेे घरी गेली होती. क्‍लासचालक मोहन पाटील यांच्या आई-वडिलांनी त्यांना तुमचा वरदही घरी गेला, असे सांगितले. त्यामुळे  खामकर  घरी परतले. त्यावेळी  वरद  घरी आला नसल्याचे त्यांना समजले. त्यामुळे ते पुन्हा रस्त्याकडेने वरद कुठे दिसतो का ते पाहत क्‍लासकडे गेले. परंतु, त्याचा कोठेही ठावठिकाणा लागला नाही. क्‍लास परिसरात चौकशी केली असता तो एका पांढर्‍या रंगाच्या गाडीमध्ये बसून गेल्याचे काहींनी सांगितले. त्यामुळे त्याचे अज्ञातांनी  अपहरण केल्याची फिर्याद  खामकर यांनी पोलिसांत दिली आहे. 

वरदराज याच्या अचानक गायब होण्याने त्यांच्या कुटूंबियांना जबर धक्का बसला आहे. सोमवारी सायंकाळपासून इस्लामपूर पोलिस आणि वरदचे नातेवाईक त्याचा शोध घेत आहेत. परंतु दुसर्‍या दिवशीही त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नव्हता. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाने पोलिस तपास करीत आहेत. 

‘त्या’ गाडीचा शोध सुरू...

वरदराज याला क्‍लासच्या परिसरात एका पांढर्‍या रंगाच्या गाडीत बसून गेल्याचे काहींनी पाहिले आहे. गाडीच्या पाठीमागील सीटवर दोन व्यक्तींच्या मध्ये तो बसल्याचे या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. त्यामुळे त्याचे अपहरण झाले आहे की कोणी नातेवाईकांनी त्याला नेले, याबाबत अद्याप काहीच उलगडा झालेला नाही. या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्याफुटेजवरून त्या गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.

शोधासाठी पाच पोलिस पथके 
इस्लामपूर ः प्रतिनिधी 

वरदराज खामकर याचा पाच पोलिस पथके शोध घेत आहेत. परिचित व्यक्तीसोबतच तो मोटारीत बसून गेला असण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांकडून सर्व स्तरावर कसून तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

ते  म्हणाले, सोमवारी सायंकाळी 5 वाजता वरदराज  क्‍लासमधून ताकारी रस्त्यानजीक आला होता. त्यावेळी काळ्या रंगाचा शर्ट-पँट घातलेला 35 वर्षांचा  युवक तेथे आला. त्याने वरदराजला बोलविले. तोही त्याच्याबरोबर जाऊन कारमध्ये (एमएच 15/8543) त्याच्याशी परिचय असल्याप्रमाणे जाऊन बसला.  आजूबाजूला  वर्दळ असल्याने त्याला जबरदस्तीने पळविण्याचा प्रकार  घडला नसावा.
 पिंगळे म्हणाले, त्या  कारमध्ये वरद याच्यासोबत चालकासह तिघेजण होते. त्याला कारमध्ये त्या अनोळख्या व्यक्तीसोबत बघितल्याचे तेथूनच रिक्षातून जात असलेल्या शिक्षिकेने  पोलिसांना सांगितले आहे.

 त्या परिसरातील कॉल रेकॉर्ड चेक केले जाईल. संशयिताचे रेखाचित्र तयार केले आहे. टोलनाक्यांवरील व्हिडीओ फुटेज तपासण्यात आले आहेत. ते  म्हणाले, वरदराजच्या वडिलांचा कुणाशी वाद आहे का,?मालमत्ता तसेच अन्य काही कारणे आहेत का, अशा  सर्व बाजूंनी तपास सुरू आहेे.