Tue, Jul 14, 2020 02:48होमपेज › Sangli › जत तालुक्यात वादळाने कोट्यवधींचे नुकसान

जत तालुक्यात वादळाने कोट्यवधींचे नुकसान

Published On: May 30 2018 2:22AM | Last Updated: May 29 2018 8:42PMयेळवी : विजय रुपनर

कायम दुष्काळी भाग म्हणून परिचित असलेला सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सोमवारी सायंकाळी वादळी वार्‍याने हाहाकार माजविला. तालुक्यातील पूर्वभागाला तडाखा बसला. जाडरबोबलाद, निगडी खुर्द, कोणीकोणूर, सनमडी, येळवी आदी परिसरातील घरांची पडझड झाली. निगडी खुर्द येथे घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. 

उन्हाळ्यात दुष्काळाशी झुंज देणार्‍या या तालुक्याला सोमवारी सायंकाळी वादळी वार्‍याचा तडाखा बसला. जोरदार पावसासह वादळी वारे वाहू लागल्याने लोकांना घराबाहेरही पडता आले नाही. निगडी खुर्द येथे घराची भिंत पडून अंबूताई आबासो जगताप (वय 56) यांचा जागीच मृत्यू  झाला. तात्यासाहेब कोळी, चंदाबाई कोळी, संगीता चव्हाण हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.परिसरातील शंभरावर  शेडचे पत्रे उचकटून दूरवर पडले. गावातील  स्मशानभूमी पूर्णपणे जमीनदोस्त झाली. लोकांना जीव मुठीत धरून रात्र काढावी लागली. लहान मुले वृद्धांची अवस्था बिकट बनली होती. 

वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधार होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. जोरदार पाऊस असल्याने त्यांना मदतही करता येत नव्हते. मंगळवारी सकाळपासून मदतकार्याला सुरुवात झाली. प्रांताधिकार्‍यांनी तातडीने निगडीला भेट देऊन पाहणी केली. घरांची पडझड झालेल्यांची सोय करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच वैभव कोळी यांनी दिली. जत शहरासह येळवी, खलाटी, वाषाण, निगडी खुर्द, कोणीकोणूर, आबाचीवाडी, सोन्याळ, जाडरबोबलाद, टोणेवाडी, खैराव, काराजनगी, सनमडी, मायथळ, लकडेवाडी, घोलेश्वर, माडग्याळ या परिसरात मोठे नुकसान झाले आहे.  जत शहरातील  शहीद अंकुश सोलनकर चौकात झाड उन्मळून पडल्याने  शिवाजी पेठकडे जाणार्‍या रस्त्यावर  वाहतूक ठप्प झाली होती. विजेचे खांब पडल्याने अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. येळवी ते जत रस्त्यावर निगडीनजिक  ठिकठिकाणी  झाडे व  विजेच्या तारा तुटून रस्त्यावर पडल्या  आहेत. 

सनमडी येथील अर्जुन कर्ले यांच्या घरावरील कौले उडून गेली आहेत. यामध्ये त्यांचे सुमारे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. येळवी येथील तुकाराम बिरा काळे,  ज्ञानू  बिरा काळे, पांडुरंग रुपनूर यांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. डाळिंबाच्या बागा, फळफिके, रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे उन्मळून पडली आहेत.

जाडरबोबलादमध्ये एक ठार     

जाडरबोबलाद येथे पाऊस  झाला. विजेचा कडकडाटसह जोरदार वादळी वारे वाहत होते. भीमराव शिवाप्पा हिंचगेरी (वय 40) यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  घोलेश्वर, निगडी खुर्द, येळवी, सनमडी परिसरातील  विद्युत पोल कोसळले आहेत. यामध्ये बिरू म्हाकू शिंगे, पत्नी छाया शिंगे, मुलगी पूनम शिंगे, मुलगी वैष्णवी शिंगे (रा. काराजनगी),  संगीता सावंत, गणेश मोरे हे जखमी झाले आहेत. आज त्या-त्या गावांमध्ये तलाठ्यांनी जाऊन पंचनामा करण्यास सुरुवात केली. अनेक गावात झालेल्या पडझडीमुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

शेकडो कुटुंबे उघड्यावर

सोमवारी झालेल्या वादळी वार्‍यामुळे अनेक घरांची पडझड झाली. काहीजण जखमी झाले आहेत. त्यांचे कुटुंबीय जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात व्यस्त होते.

शंभरच्यावर विद्युत पोल कोसळले

वादळी वार्‍यामुळे पूर्वभागातील शंभरपेक्षा अधिक विद्युत पोल कोसळले आहेत. त्यामुळे परिसरातील अनेक गावे अंधारात आहेत. वार्‍याची तीव्रता प्रचंड होती. एका पानपट्टी चालकाचे  पत्र्याचे कपाट वार्‍याने उडून जाऊन शेगाव रस्त्याजवळ असणार्‍या मुख्य तारेवर अडकले होते. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने दिवसभर पाण्याची समस्या निर्माण झाली होती. 

नेत्यांनी फिरवली पाठ

वादळी वार्‍यामुळे जत पूर्वभागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी  ग्रामस्थ आपापल्या नातेवाईकांच्या घरीच स्वत:ची सोय करीत होते. त्या गावातील लोक मदत करीत होते. परंतु कोणीही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी फिरकले नसल्याचे लोकांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे  नेत्यांनी याकडे पाठ फिरविल्याची चर्चा होती.