Tue, Sep 17, 2019 04:48होमपेज › Sangli › संजय पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे रहा

संजय पाटील यांच्या पाठीशी ठाम उभे रहा

Published On: Apr 19 2019 1:52AM | Last Updated: Apr 18 2019 11:43PM
कवठेमहांकाळ : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत योग्य न्याय मिळवायचा असेल; तर या निवडणुकीत खासदार संजय पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. या भूमिकेतून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. कोणत्याही परिस्थितीत भाजपचा उमेदवार विजयी झाला पाहिजे, यासाठी रात्रीचा दिवस करा, असे आवाहन माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी केले.जाधववाडी येथील महांकाली कार्यालयामध्ये  घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभाच्यावेळी  घोरपडे बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सुभाष देशमुख होते. 

खासदार संजय पाटील म्हणाले, मी उपकारांची जाणीव ठेवणारा  आहे. लोकसभेच्या निवडणुकीत केलेल्या  उपकारांची विधानसभा निवडणुकीत दुपटीने परतफेड  केल्याशिवाय राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत घोरपडे यांना पूर्णपणे साथ दिली जाईल.

घोरपडे म्हणाले, शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मी कायम कष्ट केले. काहीवेळा सरकारी धोरणे आडवी आली. आता भाजपकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे आपण भाजपला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले, संजय पाटील यांनी यावेळी शब्द दिला आहे. आपणही दिलेला शब्द पाळला पाहिजे. सत्कारासाठी मला बांधलेल्या फेट्याचा आब राखायचा असेल तर कवठेमहांकाळ तालुक्यातून संजय पाटील यांना भरघोस मताधिक्य द्या. त्यासाठी कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करावा. तसे केले तरच, आगामी विधानसभा निवडणुकीत तासगावातून आपल्याला मदत होईल.  

मंत्री  देशमुख म्हणाले, भाजपशिवाय देशाला पर्याय नाही. संजय पाटील यांना मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे. अजितराव घोरपडे यांचा शब्द कायम प्रमाण राहिला आहे. खासदार पाटील आणि घोरपडे  या दोघांना वेगळे करण्याचा डाव सफल होणार नाही. संजय पाटील विजयी होतीलच; परंतु   भविष्यात अजितराव घोरपडेही  विजयी होतील.

सांगली बाजार समितीचे माजी सभापती भारत डुबुले म्हणाले,  घोरपडे यांनी एकदा शब्द दिला की, कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतात. या वेळी खासदार पाटील यांना मदत केली जाईल. विधानसभेच्या वेळी भाजपकडून संधी मिळणार आहे. त्यादृष्टीने काम करावे.

चंद्रकांत हाके, मकरंद देशपांडे, हायूम सावनूरकर, जीवन पाटील, आशा पाटील यांची भाषणे झाली. यावेळी राजवर्धन घोरपडे, प्रभाकर जाधव, उपसभापती सरिता शिंदे, दादासाहेब कोळेकर, अनिल शिंदे, दिनकर पाटील, तानाजी यमगर, तात्यासाहेब नलवडे, भानुदास पाटील, बाळासाहेब कोठावळे, पांडुरंग पाटील, दिलीप झुरे, सुनील माळी, बाबूराव सूर्यवंशी, दिलीप पाटील, अरूण खरमाटे, जयराज घोरपडे, अजितराव शिंदे, महावीर माने,  बाळासाहेब कुमठेकर, अनिल लोंढे, इरळीचे उपसरपंच माणिक कदम, दिलीप झुरे, ढालेवाडीचे सरपंच रामभाऊ साळुंखे, मिलिंद कोरे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या दूरध्वनीवरून घोरपडे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित लोकांशीही संवाद साधला. त्यावेळी फडणवीस म्हणाले, घोरपडे प्रामाणिकपणे काम करतात. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. कार्यकर्त्यांनी भाजपला साथ द्यावी.  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex