Sat, Dec 07, 2019 09:56होमपेज › Sangli › सांगलीकर स्मृतीचा धडाकेबाज विक्रम

सांगलीकर स्मृतीचा धडाकेबाज विक्रम

Last Updated: Nov 09 2019 2:07AM
अँटिग्वा : वृत्तसंस्था
कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने तिसर्‍या वन-डे सामन्यात विंडीजवर मात केली. सांगलीकर स्मृती मानधनाने या सामन्यात 74 धावांची अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या कामगिरीदरम्यान स्मृतीने आणखी एक विक्रम केला आहे. वन-डे क्रिकेटमध्ये 2 हजार धावांचा टप्पा सर्वात जलद पार करणार्‍या खेळाडूंच्या यादीत स्मृती दुसर्‍या स्थानी पोहोचली आहे.

23 वर्षीय स्मृती मानधनाने 51 डावांमध्ये अशी कामगिरी करून दाखवली. याआधी भारताच्या शिखर धवनने 48 डावांमध्ये ही कामगिरी करून दाखवली होती. याचसोबत महिला क्रिकेटमध्ये     
अशी कामगिरी करून दाखवणार्‍या फलंदाजांच्या यादीत स्मृती तिसर्‍या स्थानी आहे. स्मृतीच्या आधी ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने (41 डाव) आणि मेग लेनिंग (45 डाव) यांनी सर्वात जलद 2 हजार धावांचा पल्ला पूर्ण केला आहे.

स्मृती मानधनाच्या खात्यात सध्या 2 हजार 25 धावा जमा आहेत. 51 वन-डे सामन्यांच्या कारकिर्दीत स्मृतीने आतापर्यंत 43 च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. तिच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 शतके आणि 17 अर्धशतकेही जमा आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाच्या नावावर वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2 हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम आहे. त्याने 40 डावांमध्ये अशी कामगिरी केली आहे.