Tue, Jul 14, 2020 02:44होमपेज › Sangli › द्राक्षबागांची पीकछाटणी खोळंबली

द्राक्षबागांची पीकछाटणी खोळंबली

Published On: Aug 21 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 8:16PMतासगाव : दिलीप जाधव 

तासगाव तालुक्यात आता पावसाने ओढ दिली आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अद्यापि सरासरीच्या 30 टक्के पाऊस पडला आहे. यामुळे शेतकर्‍यांना अभूतपूर्व पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याचा द्राक्षबागांना फटका बसणार आहे.ऑगस्टमध्ये घेतली जाणारी हजारो एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांची पीक छाटणी लांबणीवर पडली आहे.यामुळे हवालदिल झालेल्या द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.  

तालुक्यात दरवर्षी जूनमध्ये सरासरी 87 मि. मी.,  जुलैमध्ये सरासरी 107 मि. मी., ऑगस्टमध्ये सरासरी 78  मि. मी. पाऊस पडतो. पावसाच्या पाण्याच्या जोरावर पूर्व भागातील द्राक्षबागायतदार शेतकरी पीक छाटणी घेतात. यंदा मात्र जून महिन्यात 51 , जुलैमध्ये 43   तर ऑगस्टमध्ये जेमतेम 39 मिलीमीटर पाऊस झाला आहे.दि. 20 ऑगस्ट अखेर 133 मिलीमीटर पावसाची नोंद आहे.   

आता ऑगस्ट संपत आला तरी पावसाचा मात्र मागमूस नाही. उन्हाळ्यात कोरडे पडलेले तलाव अजूनही कोरडेच आहेत. विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी 400 फुटांच्या  खाली गेली आहे.  पीक छाटणीला पाणी कोठून आणायचे या चिंतेने द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत.  पूर्वेकडील  सावळज, डोंगरसोनी, सिध्देवाडी, दहिवडी जरंडी, वायफळे, बिरणवाडी, मणेराजुरी भागात ऑगस्ट दुसर्‍या पंधरवड्यात छाटणी घेतली जाते. मात्र आता छाटणी लांबली आहे.