Mon, Sep 16, 2019 05:38होमपेज › Sangli › राष्ट्रवादी, शिवसेनेच्या गोटात शांतता 

राष्ट्रवादी, शिवसेनेच्या गोटात शांतता 

Published On: Mar 20 2019 1:10AM | Last Updated: Mar 19 2019 11:01PM
सांगली : प्रतिनिधी 

सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, भाजपमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे त्यांच्या मित्रपक्षांच्या गोटात शांतता आहे. राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्व घडामोडींपासून अलिप्त राहणेच पसंत केले आहे. 

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी सहा महिन्यांपूर्वीच जाहीर झाली आहे. मतदारसंघांचे वाटप झाले आहे. राष्ट्रवादीने बर्‍यापैकी उमेदवार फायनल करीत आणले आहेत. काँग्रेसने काही ठिकाणीच उमेदवार जाहीर केले आहेत. हातकणंगलेची जागा स्वाभिमानीला देऊन राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. वास्तविक हातकणंगणेत स्वाभिमानीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी हे गेल्या दोन निवडणुकीत जिंकून आले आहेत. त्यामुळे जिंकून न येणारी जागा बहाल करुन राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर स्वाभिमानीलाही गुंडाळले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीच्या जागेबाबत जाणीवपूर्वक वाद निर्माण होईल, याची काळजी घेण्यात आली आहे.  यासाठी राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना फारसे सक्रीय न होण्याच्या अप्रत्यक्ष सूचना दिल्या आहेत. त्यात काँग्रेस-स्वाभिमानीच्या गोंधळाची भर पडली आहे. उमेदवारीबाबत तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते भूमिका घ्यायला तयार नाहीत. काँग्रेस जितकी डॅमेज करता येईल तितके ‘करेक्ट’ प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या हालचाली थंड आहेत. 

भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेची जिल्ह्यात फारशी ताकद नसली तरी काही निष्ठावंत कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. युती होण्यापूर्वी उध्दव ठाकरे जोरदारपणे स्वबळाचा नारा देत असल्याने जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारीचे  स्वप्न पडत होते. पण ऐनवेळी युती झाल्याने शिवसेनेत काहीशी नाराजी आहे. मात्र  काही बोलता येत  नसल्याने पदाधिकार्‍यांना ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करावा लागत आहे.   पक्षाचा उमेदवार दिला असता तर विधानसभेसाठी मतांचा अंदाज आला असता, तसेच पक्षाचे चिन्ह पोहोचण्यास मदत झाली असती, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. स्थानिक शिवसेना नेते  व भाजप नेते आणि कार्यकर्त्यांत फारसे सख्य नाही. त्यातच उमेदवारीवरुन पक्षाला डावलल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते निवडणूक प्रक्रियेपासून अलिप्त आहेत. 

सर्वच पक्षाचे कार्यकर्ते ‘संधी’ साधून घेणार 

भाजप, काँग्रेसमधील पहिल्या फळीतील नेते, दुसर्‍या फळीतील पदाधिकारी यांच्यात फारसे सख्य नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षातील कार्यकर्ते तिकीट कोणाला मिळणार यावरुन कोणाला अंतर्गत मदत करायची ते ठरविणार आहेत. राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी यांना कोणाचेच काही पडलेले नाही. सर्वच पक्षांतील कार्यकर्ते ‘जिकडं खोबरं तिकडं चांगभलं’ अशी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत आहेत.