होमपेज › Sangli › जिरवाजिरवीच्या राजकारणाचीच चिन्हे

जिरवाजिरवीच्या राजकारणाचीच चिन्हे

Published On: Mar 15 2019 1:46AM | Last Updated: Mar 15 2019 1:46AM
विटा : विजय लाळे

खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात पक्षीय तत्वांपेक्षा नेत्यांमधील परस्परांबाबतचा  अविश्‍वास आणि स्पर्धा यांनाच महत्व आले आहे. परिणामी आघाडी अथवा युतीमधून कोण उभे राहतो यापेक्षा कोण उभारले तर आपला वचपा निघू शकेल याचेच आडाखे बांधले जात आहेत.  भाजप, काँग्रेस, शिवसेनेसह राष्ट्रवादीतील बडे नेते याच विचारात  व्यस्त असल्याचे चित्र आहे. परिणामी नेता एका पक्षाचा आणि त्यांची प्रत्यक्षात भूमिका दुसरीच असे चित्र दिसले तर आश्‍चर्य वाटू नये अशीच स्थिती आहे. अर्थात यामुळे  लोकसभेसाठी  सर्वच पक्षातील उमेदवारांची स्थिती चांगलीच  अडचणीची होणार हे निश्‍चित आहे. 

खानापूर विधानसभा मतदारसंघ हा तीन तालुक्यांत विभागला आहे. खानापूर , आटपाडी हे दोन तालुके आणि तासगाव तालुक्यातील  विसापूर मंडल यांचा या मतदारसंघात समावेश होतो. शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर यांचा खानापूर तालुक्यात स्वत:चा  गट कार्यरत आहे. मात्र  विसापूर मंडलमध्ये राष्ट्रवादीचे नेते (स्व.) आर. आर.पाटील यांचे समर्थकच आमदार बाबर यांचे कार्यकर्ते आहेत. बाबर युती धर्म पाळणार असतील तर विसापूर मंडलमधील मंडळींना ती भूमिका कितपत रूचेल हा प्रश्‍नच आहे. 

त्याचवेळी आमदार बाबर यांनी आटपाडीत अत्यंत चांगली अशी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. अर्थात आटपाडीतील बाबर समर्थकांना नित्यनियमाने भाजपचे देशमुख व पडळकर या दोन नेत्यांच्या समर्थकांशी दोन हात करावे लागत आहेत. परिणामी बाबर यांचा युतीधर्म हा पुन्हा त्यांच्या आटपाडीतील समर्थकांच्या कितपत गळी उतरणार हे सांगता येत नाही. यात बाबर यांची चांगलीच राजकीय कोंडी होणार आहे.  

असेच राजकीय संकट माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासमोर देखील उभे ठाकले आहे.  माजी आमदार पाटील आणि भाजपचे खासदार संजय पाटील समर्थकांचे विसापूर मंडलमध्ये जिव्हाळ्याचे नाते आहे.   विधानसभेच्या  निवडणुकीत युतीचे उमेदवार बाबर असतील हे पक्के समजले तर खासदार पाटील आणि माजी आमदार पाटील समर्थकांना बाबर यांना सहकार्य करण्याची भूमिका घेणे रूचेल का हा कळीचा मुद्दा ठरला आहे. तसेच माजी आमदार पाटील यांची आटपाडी तालुक्यात देशमुख व पडळकर या दोन भाजप नेत्यांवर भिस्त असणार आहे. आता युती झाली तर देशमुख व पडळकर यांची भूमिका काय असेल ते पाहणेही मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

खासदार  पाटील यांच्याशी माजी आमदार  पाटील आणि आटपाडीचे देशमुख यांचे निकटचे संबंध आहेत. मात्र त्यांना आटपाडीतील गोपीचंद  पडळकर यांनी आव्हान दिले आहे.  पडळकरांशी संपर्क ठेवायचा तर खासदार पाटील यांना काय  वाटेल आणि खासदार पाटील यांचा पाठिंबा घ्यायचा तर पडळकर बरोबर राहतील की नाही याची शंका अशा दुहेरी कात्रीतून माजी आमदार पाटील व आटपाडीचे देशमुख यांना जावे लागणार आहे. याचवेळी  माजी आमदार पाटील यांना काँग्रेसअंतर्गत कदम व दादा घराण्याचा कौलही अजमावा  लागेल. आमदार मोहनराव कदम आणि आमदार बाबर यांचा दोस्ताना सर्वज्ञात आहे.  माजी मंत्री प्रतिक पाटील हे बाबर यांना प्रत्येक कार्यक्रमात काँग्रेसमध्ये येण्याचे आमंत्रण देत आहेत. 

लोकसभेचा विचार केला तर गेल्या पाच वर्षांत जे जिल्ह्यात एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून  परिचित आहेत  ते खासदार संजय पाटील यांना सहकार्य करणे आमदार बाबर यांना त्यांच्या भविष्यातील राजकारणासाठी परवडणारे असेल काय?  बाबर युतीचे उमेदवार म्हणून निश्‍चित असताना लोकसभेसाठी त्याच युुतीचे काम केले तर  पुढील काळात कोणता राजकीय नफा आणि  तोटा होईल याचाही विचार माजी आमदार पाटील समर्थकांना करावा लागेल. कारण भविष्यातील आघाडीचे उमेदवार म्हणून माजी आमदार पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे.   

पक्षीय धोरणाला तिलांजली?

खासदार पाटील यांनी राज्य सरकारकडून विटा पालिकेला भरपूर  निधी मिळवून दिला आहे. ही वस्तुस्थिती असल्याने गप्प बसतील ते खासदार पाटील कसले ते विसरून चालणार नाहीत. परिणामी  या मतदारसंघाच्या राजकारणात भविष्यात सर्वच नेत्यांच्या पक्षाच्या धोरणांशी सुसंगत भूमिका राहतील असे सध्या तरी दिसत नाही. पक्षीय धोरणे काहीही असली तरी या विधानसभा मतदार संघात तरी एकमेकांच्या जिरवाजिरवीचेच राजकारण होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.