Fri, Jul 10, 2020 03:19होमपेज › Sangli › लायकी मैदानात दाखवू

लायकी मैदानात दाखवू

Published On: Mar 19 2019 1:27AM | Last Updated: Mar 18 2019 11:29PM
विटा : प्रतिनिधी

काँग्रेससह इतर पक्षांच्या संपर्कात आहे; परंतु मी भाजपकडे उमेदवारी मागितलेली नाही. मात्र कोणत्याही परिस्थितीत मी सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार आहे. खासदार संजय पाटील यांना माझी लायकी काय आहे, ते दाखवून देणार आहे, असे भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी  पत्रकार परिषदेत जाहीर केले.

ते म्हणाले, मला कोणाच्याही वरदहस्ताची गरज नाही; मात्र  माझी लायकी काढणार्‍या संजय पाटील यांना माझी ताकद जनताच दाखवून देईल. पक्ष कोणताही असेल किंवा अपक्ष मात्र मी सांगली लोकसभा मतदारसंघात लढत देणार आहे.

पडळकर म्हणाले, 2014 मध्ये आम्ही सगळ्यांनी संजय पाटील यांना जीवाचे रान करून निवडून आणले. त्यांचे जिल्ह्यात काय होते,अन कोण होते? परंतु निवडून आल्यावर त्यांना त्याचे भान राहिले नाही. मदत करणार्‍यांच त्यांनी त्रास द्यायला सुरूवात केली. पडळकर  म्हणाले,  त्यांची जर एवढी ताकद होती, तर विधानसभा निवडणुकीत  अजितराव घोरपडे  28 हजार मतांनी पराभूत कसे झाले? तुमची ताकद  होती तर घोरपडे निवडून आले असते. तुमची ताकद  माझ्यासह भाजपच्या जिल्हा नेत्यांनी वाढवली होती. आता लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरा;  कुणाची काय लायकी आहे ते जनताच तुम्हाला दाखवून देईल. 

 ते म्हणाले, मी भाजपकडे उमेदवारी मागितलेली नाही. परंतु काँग्रेसबरोबर माझी चर्चा सुरू आहे. मला उमेदवारी दिली तर ठीक अन्यथा मी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार  आहे.  भाजपला माझी विनंती आहे, की  त्यांनी संजय  पाटील यांनाच उमेदवारी द्यावी. म्हणजे  मी माझी ताकद दाखवून देईन. 

 ते म्हणाले , मी भाजपमधील या गटाचा किंवा त्या गटाचा असे काही नाही. भाजपच्या कोणत्याही बड्या नेत्याचा मला वरदहस्त नाही. त्याची मला गरजही नाही. मी कुणाचा वरदहस्त घेऊन राजकारणात काम करीत नाही. कुणी फूस लावून काही काम करणाराही मी माणूस नाही. पडळकर म्हणाले, आमची आरक्षणासंदर्भात लढाई सुरू होती त्यावेळी  महाड ते मुंबई येथील रॅलीच्या निमित्ताने मी एकदा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना भेटलो होतो. त्यांनी महाड येथे आमच्या रॅलीची सुरुवात करावी अशी विनंती  केली होती. दोन तास चर्चाही केली होती. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. 

पडळकर म्हणाले,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उद्धव ठाकरे यांच्याबरोबर माझे चांगले संबंध आहेत. अनेकदा आमची चर्चा झाली आहे. धनगर आरक्षणासंदर्भात त्यांनी  मला मोलाची साथ दिली आहे. जे मिळते ते घ्यायचे आणि ते मिळत नाही त्यासाठी पुन्हा चळवळीच्या माध्यमातून लढत राहायचे एवढेच मला माहिती आहे.